हल्ली मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. पण ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी देशात जोर धरत आहे.
एकेकाळी केवळ टाईमपास असलेलं ऑनलाईन गेमिंग सवय कधी झालं आणि त्यानंतर व्यसन कधी झालं हे आपल्यालाही समजलं नाही. मात्र आता आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची ‘साथ’ आलीये की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. कारण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय चर्चिला गेला आहे.
राज्यसभेत भाजप खासदार सुशील मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 24 तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्याचं व्यसन लागत आहे.
ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रणासाठी कायदा आणण्याची गरज व्यक्त होत आहे. काही जणांनी तर सरसकट बंदीची मागणीही केलीये. मात्र अशी बंदी घालणं शक्य आहे का, याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. कारण, ऑनलाईन गेमिंगमधील उलाढाल प्रचंड आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगला कायद्याच्या चौकटीत बसवून त्यावर नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं आहे. पालकांनीही आपली मुलं यात किती वेळ वाया घालवतायत, याकडे लक्ष दिलं पाहिजे.