जन्म. २१ एप्रिल १९५० देवगड सिंधुदुर्ग येथे.
सिनेसृष्टीतील दिग्गज आणि चतुरस्त्र अभिनेते म्हणून शिवाजी साटम हे नाव आग्रहानं घेतलं जातं. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतसुध्दा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.‘सीआयडी’ ह्या वर्षानुवर्ष सुपरहीट ठरलेल्या हिंदी मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ ही त्यांची प्रमुख भूमिका प्रचंड गाजली. एवढंच नाही तर ह्याच नावाने त्यांना आज ओळखलं जातं.
शिवाजी साटम यांचे वडील मुंबईत टेक्सटाइल मिलमध्ये नोकरीला होते. मुंबई विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात पदवी घेतल्यानंतर शिवाजी साटम यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा केला. पुढे शिवाजी साटम यांनी आपले करियर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कॅशियरची नोकरी सुरु केले. २३ वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात बँकेतर्फे होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विशेषतः नाटकांमधून त्यांचा सहभाग असायचा. नाटकाच्या आवडीमुळे त्यांनी हौशी रंगभूमीवर काही काळ काम केले. शिवाजी साटम यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात थिएटर पासून झाली. अशाच एका नाटकाच्या प्रयोगावेळी १९८० ला एका निर्मात्याने काम पाहून ‘रिश्ते नाते’ या सिरीयलमध्ये काम करण्याची ऑफर दिली आणि शिवाजी साटम यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. यानंतर त्यांनी बऱ्याच मालिका केल्या. एक शून्य शून्य या मालिकेने त्यांना ओळख दिली. मराठी नाटक, मालिका, काही चित्रपट असा प्रवास सुरु असताना १९९८ मध्ये सीआयडी या मालिकेसाठी बोलावणे आले. ‘एक शून्य शून्य’ पासून ते बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत त्यांची टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. त्या सगळ्या सिरियल्स मध्ये शिवाजी साटम यांनी काम केले आहे. अगदी ‘आहट’पासून ते ‘सीआयडी’पर्यंत.
शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले. स्टेजवर अप्रतिम आणि मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. विजया मेहता, आत्माराम भेंडे, मधुकर तोरडमल, सतिश दुभाषी. हिंदीत गुलजार, सुभाष घई, पार्थो घोष, महेश मांजरेकर, हॅरी बावेजा यांच्याबरोबर कामे केली आहेत. एक शुन्य शुन्य, ‘आहट’, ‘सीआयडी’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका, ‘उत्तरायण’, ‘हापूस ‘दे धक्का’ हे शिवाजी साटम यांचे गाजलेले चित्रपट. अलीकडच्या काही वर्षांतील सर्वांत गाजलेल्या आणि सर्वांत जास्त काळ चाललेल्या मालिकांपैकी एक असलेल्या ‘सीआयडी’ मालिकेने छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. शिवाजी साटम हे गेल्या अनेक वर्षांपासून एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका हे करत होते. या मालिकेतील एसीपी प्रद्युम या भूमिकेमुळे शिवाजी साटम यांना प्रसिध्दी मिळालीच पण हिंदी चित्रपटसृष्टीची दार त्यांच्यासाठी उघडली गेली. तसे त्यांनी १९८७ मध्ये पेस्तोंजी या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते.
छत्रपती अवॉर्ड विजेत्या राज्यस्तरावरील कबड्डी खेळाडू अरुणा साटम यांच्याशी विवाह झाला पण दुर्दैवाने २००० मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. शिवाजी साटम यांना अनिरुध्द आणि अभिजीत अशी दोन मुले आहेत. अनिरुध्द मराठी नाट्यसृष्टीत तर अभिजीत मराठी चित्रपटांचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर ह्या मराठीतील अभिनेत्री, त्या शिवाजी साटम यांचे चिरंजीव अभिजीत साटम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. शिवाजी साटम यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
इंग्लिश अगस्त, यशवंत, गुलाम ए मुस्तफा, युगपुरुष – अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन अ वे, चायना गेट, वजूद, हूतूतू, दाग दी फायर, सूर्यवंशम, वास्तव, स्प्लिट वाइड ओपन, पुकार, बाघी, निदान, जिस देश में गंगा रहेता है, कुरुक्षेत्र, जोडी नंबर 1, एहसास – द फिलींग, नायक – द रियल हिरो, पिता, हथ्यार, फिलहाल, प्राण जाये पर शान न जाये, बर्दाश्त, गर्व – प्राइड अँड ऑनर, उत्तरायण, विरुध्द, टॅक्सी नंबर 9211, दे धक्का, हापूस, हे त्यांचे काही हिंदी व मराठी चित्रपट आहेत.
संजीव वेलणकर, पुणे.