कुत्र्यापासूनही माणसापर्यंत नवा कोरोना विषाणू पोहोचत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. हे वास्तव संपूर्ण जगाची चिंता वाढवणारे आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये कुत्र्यापासून संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूचे निष्पन्न झाले आहे. ‘क्लिनिकल इन्फेक्शनस डिसीज’ नावाच्या जर्नलने गुरुवारी एक संशोधन अहवाल प्रकाशित केला. या अहवालात संशोधकांनी सांगितले की मलेशियामध्ये निमोनियाच्या 301 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ जणांना ‘कॅनिन कोरोना विषाणू’ची लागण झाल्याचे निदान झाले. या रूग्णांची तपासणी नोजल स्वॅब अर्थात नाकातून घेतलेल्या नमुन्यांद्वारे करण्यात आली होती.
कॅनिन कोरोना विषाणू हा कुत्र्यामध्ये आढळणारा कोरोना विषाणू आहे. त्यामुळे मलेशियामध्ये ज्या रुग्णांमध्ये या विषाणूचा संसर्ग आढळला, त्यावरून कुत्र्यांच्याच माध्यमातून हा विषाणू मनुष्यापर्यंत पोहोचल्याचा संशय संशोधकांनी वर्तवला आहे. मलेशियामध्ये आढळलेले कॅनिन कोरोना विषाणूच्या रुणांमध्ये बहुतांश लहान मुले असून त्यांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी आहे. रूग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेसिंगमधून सीसीओव्ही-हूप्न-2018 नावाच्या स्ट्रेनचा उलगडा झाला आहे. या विषाणूचे गुणधर्म हे मांजर आणि मगरीमध्ये आढळणाऱ्या कोरोना विषाणूशी मिळतेजुळते आहेत. मात्र हे गुणधर्म कॅनिन कोरोना विषाणूशी तुलनेत अधिक प्रमाणात जुळणारे आहेत. ‘सार्स-सीओव्ही-2’मुळे कोविड-19 पसरतो. बहुतांश विषाणू सर्वात आधी वटवाघळामध्ये आढळून आले होते. कधीकधी हा विषाणू वटवाघळपासून थेट मनुष्यापर्यंत पोहोचतो, तर कधी दुसऱ्या जनावरांना संक्रमित करतो, मनुष्यापर्यंत पोहोचतो.