आज दि.१३ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

प्रतीक्षा संपली! २६ पासून भाविकांना पाहता येणार सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप! 

आदिमाया सप्तशृंगी देवीचे मूळ मनोहर रूप बघण्यासाठी सर्वच भक्तांना ओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.आता मूर्ती संवर्धन प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आता मात्र भाविकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसापासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणचे प्रांत विकास मिना यांनी दिली आहे. जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यापासून देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती. मूर्तीवरील 1100 किलो शेंदूर काढण्यात आला आहे.यामुळे आता देवीचे मूळ रूप समोर आले आहे. देवीचे हे मनोहररूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सर्वच भाविकांना आस लागली आहे.

तेरा पीछा नहीं छोडूँगा; मान्सूसचा कहर कायम; पुढील 3-4 दिवस अख्ख्या राज्यभरात मुसळधार पाऊस

राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. यानंतर आता हवामान खात्याने राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात आणखी एक इशारा दिला आहे.पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि कृपया येथे सूचित केल्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारी 1.45 वाजतापर्यंत गेल्या 6 तासात पावसाच्या वारंवार तीव्र सरी दिसल्या आणि पुढील 2, 3 दिवस हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या या सक्रिय टप्प्यात काळजी घ्या आणि सतर्क रहा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं, असं मुंबईकरांना कदाचित हा मान्सून सांगत असेल, असं हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळीकर म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे-जयंतरावांची टीका, फडणवीस रशियाला, अजित पवार एकनाथ शिंदेच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. सध्याच्या घडामोडींवरुन भविष्यातल्या राजकीय घडामोडींचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रचंड आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आजही पत्रकार परिषद घेवून वेदांता कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला कशी गेली? असा सवाल करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील या मुद्द्यावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशाप्रकारची टीका होत असताना महाराष्ट्रात वेगळ्या राजकीय भेटीगाठीदेखील होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले असताना या भेटीगाठी होत आहेत. अर्थात या भेटीगाठींमध्ये काही महत्त्वाचे कारणं देखील असू शकतात. पण या भेटीगाठीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

ट्विटरवर पंतप्रधान मोदींनंतर विराटचा नंबर

आशिया कपमध्ये विराटची बॅट पुन्हा चालली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या नंबरवर राहिला. एक शतक आणि दोन अर्धशतक ठोकून विराटनं आपल्या टीकाकारांची तोंडं बंद केली. पण याच परफॉर्मन्सनंतर विराट सोशल मीडियातही किंग बनलाय. कारण त्याच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. सध्या भारतात सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असलेल्या व्यक्तिंच्या यादीत विराट पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.विराट कोहलीच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 50 मिलियन्स म्हणजेच तब्बल पाच कोटींवर पोहोचली आहे. विराट जगातला पहिला क्रिकेटर आहे ज्यानं 5 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. विराटपाठोपाठ सचिनचे ट्विटरवर 3.7 कोटी फॉलोअर्स आहेत. भारताचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 8 कोटी 20 लाख इतकी आहे. तर पंतप्रधानांच्याच पीएमओ या अधिकृत अकाऊंटचे तब्बल 5 कोटींच्या वर फॉलोअर्स आहेत. त्यापाठोपाठ विराट कोहलीचा नंबर लागतो.

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ, पोलिसांकडून एका महिलेला अटक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने केली. ही महिला ठाण्यातील रहिवासी आहे.

स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी…’, मोठी कंपनी महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे भडकले

महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार होती. ‘वेदांता-फॉक्सकॉन’ ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती. पण राज्यात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर अचानक ही कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. विशेषत: वेदांतासारखी कंपनी महाराष्ट्रात तब्बल 1 लाख तरुणांना रोजगार देणार होती. पण ही कंपनी अचानक गुजरात गेली, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी आज माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या भाजप-शिंदे गटाच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर सडकून टीका केली. “राज्यातलं सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. दोन महिन्यांत नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करा, असे निर्देशही औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे.राज्यात २०१९ साली सत्तांत्तर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने १६ विश्वस्तांची नेमणूक साईबाबा संस्थानावर केली होती. मात्र, विश्वस्तांची नेमणूक ही नियमाला धरून नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ममतांच्या राज्यात तुफान ‘राडा’, पोलीस आणि आंदोलक भिडले

ममता सरकारविरोधात भाजपने आंदोलन केलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात भाजपने आंदोलन केलं. या आंदोलनावेळी खूप गोंधळ झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा वापर करावा लागला. हावडामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात भाजपने युद्ध पुकारले असून कोलकात्यासह बंगालच्या अनेक शहरांमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. भाजप कार्यकर्ते ममता सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या तोफांचाही वापर केला. याशिवाय भाजप आमदार शिवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक! 1 लिटर पेट्रोलमध्ये 120KM प्रवास

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने अशी किमया साधली आहे, ज्याने या दरवाढीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. रजनीश असं या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने भंगातून बाईक तयार केली आहे. ह्या बाईकला 3,000 रुपये खर्च आला असून एक लिटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा त्याने केला आहे.

लखीमपूर खेरीच्या मैलानी येथील कोतवाली परिसरात राहणारा दहावीचा विद्यार्थी रजनीश कुमार याला एक महागडी बाईक घ्यायची होती. पण पैशांअभावी तो करू शकला नाही. मात्र, भंगारातून वस्तू खरेदी करून सुमारे ₹3000 ची जुगाड बाइक बनवण्यात तो यशस्वी झाला. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 120 किमी चालते, असा त्याचा दावा आहे

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.