उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांना साधारण वर्षभराचा काळ राहिलेला असतानाच योगी सरकारचा घामटा फुटेल अशी घटना लखीमपूरमध्ये घडलीय. कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येतोय. हया घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण तापलेलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत:चे सर्व कार्यक्रम रद्द करुन राजधानी लखनौ गाठलेलं आहे. तिथूनच ते सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी काही हिंसक घटना होऊ शकतात याचा अंदाज घेत, लखीमपूर भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीं तसच शेतकरी नेते टिकेत हे लखीमपूरसाठी रवाना झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे याच घटनेत मृत पावलेल्यांपैकी 4 जण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समजतं.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. ह्या घटनेनंतर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली. आधी आंदोलकांनी दगडफेक केली की आधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली यावर आरोप प्रत्यारोप आता सुरु झालेत. पण ह्या घटनेमुळे योगी सरकारला संकटात टाकल्याचं दिसतंय.
लखमीपूरच्या ह्या घटनेवर मंत्री अजय मिश्रा काय म्हणाले ते नंतर पाहुया, आधी त्यांचा आरोप असलेला मुलगा आशिष मिश्रा काय म्हणाला ते पाहुया- आशिष मिश्रानं दावा केलाय की, जी गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली गेली, त्या गाडीत तो नव्हताच. मी सकाळी 9 पासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बनवारीपूरलाच होतो. ह्या घटनेत माझ्यावर जे आरोप करण्यात येतायत ते पूर्णपणे आधारहीन आहेत आणि ह्या घटनेचा न्यायिक तपास करण्यात यावा अशी मी मागणी करतो असं आशिष मिश्रांनी म्हटलंय.