भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. मात्र, यावेळी त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केलं. माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं सांगतानाच समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
इन्कम टॅक्स विभागाने अडीच वर्षापूर्वी माझ्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यानंतर अडीच वर्ष झाले तरी काहीच कारवाई केली नाही. आता सोमय्या यांनी उठून बेनामी संपत्तीचा आरोप केला आहे. कुठून शोध लावला त्यांनी? सोमय्या या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही. त्यांनी आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप केले. खरं तर त्यांनी कागल आणि कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती. ते आले असते तर त्यांना माहिती मिळाली असती, असा चिमटा त्यांनी काढला.