गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्तरावर प्रचंड चर्चेत असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांचे यूट्युबवरील Youtube एक भाषण सध्या चांगलेच गाजत आहे. या भाषणात नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या काळात आपल्या जीवनात कसे बदल झाले, याबद्दल सांगितले आहे. कोरोनाच्या काळात मी टेक्नोसॅव्ही होण्यासाठी काही पाऊले उचलली. मी यूट्युब चॅनेलवर सक्रिय झाल्याने आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा खुलासा नितीन गडकरी यांनी केला. याशिवाय, ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सची संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या. मला सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लागली. या काळात मी भगवदगीताही ऐकायला लागलो. आयुष्यात मला पहिल्यांदाच गीतेचे दहा अध्याय, त्याचे विवेचन शांतपणे ऐकण्याची आये.. यानिमित्ताने मला मिळाली. ही माझ्यादृष्टीने खूप मोठी गोष्ट असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
ऐंशीच्या दशकात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे देखील पराभूत झाले होते. तो काळ आमच्यासाठी प्रचंड निराशेचा होता. अनेकजण या पक्षाला भविष्य नाही, तू चांगला आहे, पण या पक्षात तुझे काही होणार नाही, असे सांगत होते. तेव्हा मी देखील या गोष्टीवर खूप विचार केला. मात्र, हा पक्ष माझ्या विचारांचा होता. त्यामुळे काहीही झाले तरी हा पक्ष सोडणार नाही, हे मी तेव्हाच ठरवल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.