महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं सांगितलं. लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारल्यानं व्हेंटिलेटर काढण्यात आलां असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोरोना आणि न्यूमोनियातून लता मंगेशकर बऱ्या झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबाबत माहिती घेण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांबरोर बोलून राजेश टोपे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. लता मंगेशकर कोरोनातून आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्यानं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
राजेश टोपे यांनी डॉ. प्रतीत समदानी यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं. डॉ. प्रतीत समदानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या, आता मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे. आता व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला असून त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. लता मंगेशकर उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राजेश टोपे म्हणाले. लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्या असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
लता मंगेशकर यांच्या ट्विटरवर हँडलवरून 27 जानेवारीला त्यांच्या चाहत्यांना सांगण्यात आले होते की, त्यांच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यावेळी त्यांना लावण्यात आलेला व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. त्यांची काळजी घेण्यासाठी डॉ. प्रतीत सामदानी आणि त्यांची टीम काम करीत आहे.