नागपुरात एसटीचे कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या पावणेतीन महिन्यांपासून हे कर्मचारी संप करत आहेत. त्यामुळं अद्यापही एसटीची वाहतूक रुळावर आली नाही. भविष्यातील तरतूद म्हणून एसटीने एसटीत कार्यरत असलेल्या वाहकांच्या हातातही स्टेअरिंग देण्याची तयारी चालविली आहे. सध्या अशा तीस महिला कर्मचारी यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. महिला चालकाची भरती प्रक्रियेत दोनशे पंधरा महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे महिलांचे प्रशिक्षण रखडले होते. दहा महिन्यांपूर्वीच तीस महिलांनी प्रशिक्षणास सुरुवात केली. मार्च-एप्रिलमध्ये एसटीच्या सेवेत महिला रुजू होणार आहेत.
प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाचाही महसूल बुडत आहे. महामंडळानेही कर्मचार्यांविरुद्ध कडक कारवाईची भूमिका घेत कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करणे सुरू केले. त्यानुसार विभागातील बडतर्फ कर्मचार्यांची संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. नागपूर विभागात प्रशासकीय 476, कार्यशाळा 530, चालक 752, वाहक 619 असे एकूण 2 हजार 377 कर्मचारी आहेत. आजवर केवळ सुमारे 128 कर्मचारी कामावर परतले. परंतु, मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं एस प्रशासनानं एसटीचे स्टेअरिंग खासगी चालकांच्या हाती दिले. सोबतच संपकरी कर्मचार्यांवर कारवाईचा सपाटाही सुरू ठेवला आहे.
नागपूर शहर व ग्रामिण भागातील आठ आगारातील संपकरी कामावर रुजु न झाल्याने एसटी चालकाची मागणी वाढली आहे. महामंडळाच्यावतीने एक वर्षाचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. त्यातील आठ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. हा कालावधी संपल्यानंतर त्यांना जबाबदारी दिली जाईल. नागपूर विभागात सुमारे 450 बसगाड्या आहेत. संपकाळात केवळ सत्तर बस विविध मार्गावर धावत आहेत. 380 बसगाड्या धावण्यासाठी एसटी महामंडळाला खाजगी कंपनी सोबतच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या चालक-वाहकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग द्यावे लागणार आहे.