दहावी परीक्षेचा निकाल 17 जूनला
ऑनलाईन जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी पालकांना होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.
अग्निपथ भरती योजनेला विरोध,
बिहार, हरियाणामध्ये जाळपोळ
लष्करात अग्निपथ भरती योजनेला बिहारमध्ये जोरदार विरोध होत आहे. हे लोण आता इतर राज्यातही पसरलं आहे. हरयाणामध्ये गुरूग्राम इथेही या योजनेला मोठा विरोध सुरू झालाय. गुरूग्राममध्ये आंदोलकांनी हायवेवर चक्काजाम आंदोलन केलं. बिहारमधील नवादा इथं आंदोलक विद्यार्थ्यांनी भाजपच्या कार्यालयाला आग लावली. बिहारमध्ये अनेक भागात तरूणांनी मोर्चे काढले तसंच जाळपोळही केलीय. कालपासूनच बिहारमध्ये या विरोधाला सुरूवात झालीय. बिहारच्या मुंगेर, सफियासराय, जहानाबाद, बक्सर, आराह, भभुआ भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी जहानाबादमध्ये जाळपोळ केली.
‘आई आजारी, उपचार सुरु, शुक्रवारी चौकशीपासून सुट्टी द्या’, राहुल गांधींचं ईडी अधिकाऱ्यांना पत्र
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरु आहे. राहुल गांधी यांची ईडीकडून गेल्या तीन दिवसांत तब्बल 30 तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांनी काल रात्री ईडी अधिकाऱ्यांना एक विनंती केली होती. राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना गुरुवारी चौकशीसाठी येता येणार नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी ईडी चौकशीसाठी हजर न राहण्याबाबत मुभा मागितली होती. राहुल गांधी यांनी केलेली विनंती ईडी अधिकाऱ्यांनी लगेच मान्य केली होती. त्यानंतर आज आणखी एक नवी अपडेट समोर आली आहे. राहुल गांधी यांनी ईडीला पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी शुक्रवारी ईडी चौकशीपासून सुटका मिळावी यासाठी पत्र पाठवलं आहे.
राहुल गांधी यांचा
अग्निपथ योजनेला विरोध
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी अग्निपथ या योजनेचा विरोध केला असून तरुणांच्या भविष्याशी खेळू नका असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. त्यांनी अग्निपथ या योजनेला कडाडून विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अग्निपथ या योजनेला विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. “दोन वर्षांपासून सरळ भरती करण्यात आलेली नाही. चार वर्षानंतर युवकांचे भविष्य अस्थिर होईल. तसेच या काळात कोणताही रँक मिळणार नाही. तसेच कोणतेही पेंशनदेखील मिळणार नाही. सरकारकडून संरक्षण दलाच सन्मान केला जात नाहीये.
देवेंद्र फडणवीसांचं मोदींसाठी ‘Mission 26’
भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड घडामोडी सुरु असताना भाजप मात्र नव्या मिशनला लागलं आहे. हे मिशन म्हणजे ‘मिशन 26’!
नोटीस दिल्याशिवाय राज्य सरकारला
बांधकाम पाडता येणार नाही
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईचं प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना कायदेशीर नोटीस दिल्याशिवाय राज्य सरकारला बांधकाम पाडता येणार नाही, असं म्हटलंय. तसेच उत्तर प्रदेश सरकारला पुढील तीन दिवसात या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यावेळी पाडकामाची कारवाई करताना कायद्याचं पालन व्हावं असंही नमूद केलंय. जमियत उलमा-ए-हिंदने उत्तर प्रदेश सरकारच्या बांधकाम पाडण्याच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली.
विमान प्रवास आता
महागण्याची शक्यता
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बातमीमुळे मोठा धक्का बसू शकतो. दिल्लीतील एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती तब्बल १६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हवाई इंधनाच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. एका खाजगी मीडियाच्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये हवाई इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. दिल्लीत एटीएफचा दर १.४१ लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचला आहे, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. १६ जून रोजी त्यात १६.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सहा महिन्यांत इंधनाच्या किमती ९१ टक्क्यांनी वाढल्या.
बेकायदा बांधकाम प्रकरणातील
राणे यांची याचिका फेटाळली
अधिश बंगला बेकायदा बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा मिळालेला नाही. मुंबईत उच्च न्यायालयाने नारायण राणे यांची याचिका फेटाळली असून हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) पाठवलेल्या नोटिशीविरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेने नारायण राणे यांचा बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. पण उच्च न्यायालयाने राणे यांना बांधकाम नियमित करण्याबाबत प्रस्ताव करण्यास सांगताना तो फेटाळल्यास २४ जूनपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली होती. एमसीझेडएमएच्या जिल्हास्तरीय समितीने नारायण राणे यांना नोटीस बजावली होती.
नागपूर मध्ये बीए-५ प्रकारचे
दोन रुग्ण आढळले
उपराजधानीत प्रथमच करोनाच्या ओमायक्राॅन विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेल्या बीए-५ प्रकारचे दोन रुग्ण आढळले आहेत. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणेच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम शाखेला या रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना मागितल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) प्रयोगशाळेतील जनुकीय चाचणीत हा नवीन विषाणूचा प्रकार पुढे आला आहे.
पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम
ठोकून नवा पक्ष स्थापन करावा
विधानपरिषदेसाठी संधी मिळेल असा अंदाज बांधला जात असताना माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना ऐनवेळी डावलण्यात आले. विधानपरिषदेसाठी पंकजा यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. असे असतानाच आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठे विधान केले आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम टोकून नवा पक्ष स्थापन करावा. त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असा सल्ला जलील यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात भाषण नाकारणे प्रकरणावर अजितदादा पहिल्यांदाच बोलले
देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. पण, आता या प्रकरणावर मला काहीही बोलायचे नाही. पंतप्रधान आता दिल्लीत पोहोचले आहेत. कार्यक्रम चांगला झाला होता, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मिलिंद गवळी वाढदिवशी मिस करतायत आईला
‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. मिलिंद गवळी या भूमिकेला अभिनयाच्या कौशल्याने एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत. भूमिका जरी नकारत्मक असली तरी त्यांची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आज मिलिंद गवळी यांचा वाढदिवस आहे. मालिकेच्या सेटवर तर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाच आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या दिवशी मिलिंद गवळी यांना त्यांच्या आईची आठवण सतावत आहे. या दिवशी ते त्यांच्या आईला खूप मिस करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
आराम आणि टाईमपास कर, आफ्रिदिने विराटच्या जखमेवर मीठ चोळलं!
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीच्या ऍटिट्यूडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नाही. अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ विराटला शतकही करता आलेलं नाही. 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्याच राऊंडला बाहेर झाली, यानंतर विराटने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, मग विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, तसंच त्याने टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडली.त्याच्याकडे क्लास आहे, पण त्याला नंबर 1 व्हायचं आहे का? आपण आयुष्यात सगळं मिळवलं आहे, आता आराम करा आणि टाईमपास करा, असा विचार तो करत आहे का,’ अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली.
SD social media
9850 60 3590