भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याची अद्याप काहीही सांगता येत नाही.
केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. पण जेव्हा ती येईल तेव्हा ती किती धोकादायक असेल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कोरोनाचे रुपांतर सतत होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवे. कोरोनाची लस प्रभावी आहे. पण त्यात अजून कशी सुधारणा करता येईल, यावर संशोधन सुरु आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांच्यामते, थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.
कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसऱ्या सुपर स्प्रेडर, तिसरा नवी व्हेरिंटचा शोध घेणे. म्हणजे सर्वात आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण सुपर स्प्रेडर इव्हेंटला किती रोखू शकतो. तिसरे म्हणजे आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो ? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
गणिताचे मॉडेल तज्ज्ञ प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ” कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यातील काहींना कोरोना सदृश लक्षणही जाणवत नाहीत. पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यात लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा प्रभाव कमी होईल.