सावरकर हे धार्मिक नव्हते, त्यांनी गाईला केवळ एक उपयुक्त प्राणी मानले होते. तसेच गोमांस खाण्यात काहीच चुकीचे नसल्याचे देखील सावरकर म्हणत असत. त्यांनी हिंदूची ओळख निर्माण करण्यासाठी हिंदुत्व हा शद्ब प्रचारात आणला. त्यापलीकडे हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही. मात्र भाजपाने आपल्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या “सनराइज ओव्हर अयोध्या” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयींच्या गांधीवादी समाजवाद अपयशी ठरला होता. यानंतर पक्षाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला. दिग्विजय सिंह यांनी देशातील द्वेषाच्या वातावरणासाठी अडवाणींना जबाबदार धरले. ते म्हणाले की, 1984 नंतर भाजपने कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अवलंबला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा आधार आहे. अडवाणींच्या रथयात्रेने समाजात फूट पाडली. अडवाणी जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली. भाजपाकडून जाणीवपूर्वक हिंदू धर्म संकटात असल्याचा प्रचार करण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. भारतावर 500 वर्ष मुस्लिम शासकांचे राज्य होते. त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रज आले. मात्र तरी देखील हिंदू धर्म आहे तसाच राहिला. मग आता हिंदू धर्म संकटात कसा असा सवालही दिग्विजय सिंग यांनी यावेळी केला.
दरम्यान या कार्यक्रमाला माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचीही उपस्थिती होती. त्यांनी देखील यावेळी बोलताना भाजपाला टोला लगावला आहे. महात्मा गांधींना जे अभिप्रेत होते, ते खरे राम राज्य होते. मात्र आता रामराज्य राहिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली, ही घटना अंत्यत चुकीची होती. कोर्टाच्या निर्णयानंतर वर्षभरात सर्वांची सुटका करण्यात आली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, मात्र तरी देखील काही लोक धार्मीक मुद्दे उपस्थित करून राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले.