सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘पद्मविभूषण’ने सन्मानित बिरजू महाराज यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पंडित बिरजू महाराजांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. नृत्य-नाट्याला नवे आयाम जोडून त्यांनी कथ्थक नृत्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पं. बिरजू महाराज यांना आदरांजली वाहिली जात आहे.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. कथ्थक नर्तनासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेसुद्धा प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिले होते.
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली.
2012 मध्ये, त्यांना विश्वरुपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानी सिनेमातील ‘मोहे रंग दो लाल’ गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.