मुंबईतील अवकाळी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ विस्कळीत होऊ शकतो. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. बुधवारी दिवसभर पावसामुळे दोन्ही संघांना सराव सत्र रद्द करावे लागले. गुरुवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आउटफील्ड ओलं राहील. अशा परिस्थितीत भारतीय संघ वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर सराव करु शकतो कारण तिथे इनडोअर सरावाची व्यवस्था आहे, वानखेडे स्टेडियमवर तशी व्यवस्था नाही. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर अजिबात गवत नाही, ज्यामुळे संथ गोलंदाजांना मदत होईल.
उभय संघांमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. संततधार पावसामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. आद्रतेमुळे खेळपट्टी नक्कीच वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करेल, परंतु अशा विकेटमुळे फिरकीपटूंनाही चांगला टर्न मिळेल. शुक्रवारीदेखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पण दोन्ही संघ, विशेषतः भारत दुसऱ्या ते पाचव्या दिवशी हवामान खराब होऊ नये अशी प्रार्थना करेल.
हवामान खात्याचे म्हणणे आहे की 2 डिसेंबरनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. चांगला सूर्यप्रकाश असू शकतो, असेही हवामान विभागने म्हटले आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. कानपूर कसोटीत टीम इंडिया विजयापासून एक विकेट दूर होती. त्यामुळे तो सामना अनिर्णित राहिला. आता मुंबई कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.