इंग्लंडने पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी; सोप्या विजयासह मालिका खिशात

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आपल्या नावे करत इंग्लंडने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले २४५ धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करण्यात अपयश आले व त्यांना ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या लुईस ग्रेगरी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाकिस्तानची दमदार गोलंदाजी
पहिल्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्यात पुनरागमन केले. अवघ्या २१ धावांवर इंग्लंडने आपले दोन फलंदाज गमावले होते. त्यानंतर, फिल सॉल्ट व जेम्स विन्स यांनी अर्धशतके झळकावत संघाला संकटातून बाहेर काढले होते.

मात्र, त्यानंतर हसन अलीने नियमित अंतराने तीन गडी बाद करत इंग्लंडची अवस्था ७ बाद १६० अशी केली. लुईस ग्रेगरी व कार्स यांनी अनुक्रमे ४० व ३१ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २४७ पर्यंत नेली. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हसन अली याने सर्वाधिक पाच बळी मिळविले.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी केले सामन्यात पुनरागमन
तळाच्या फलंदाजांच्या मदतीने सन्मानजनक धावसंख्या उभ्या केलेल्या इंग्लंडसाठी गोलंदाजांनी पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती केली. पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या साकीब मेहमूदने या सामन्यातही उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याला लुईस ग्रेगरी, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स व फिरकीपटू मेट पार्किन्सन यांनी योग्य साथ दिली. गोलंदाजीत कमाल दाखवलेल्या हसन अलीने काही आक्रमक फटके खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. पाकिस्तानसाठी सौद शकीलने सर्वाधिक ५६ धावा बनविल्या.

इंग्लंडची पहिल्या स्थानी मजल
या विजयासह इंग्लंडने ही मालिका खिशात घातली. सोबतच २०२३ वनडे विश्वचषकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वर्ल्डकप सुपर लीगमध्ये देखील अव्वल स्थान गाठले. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १३ जुलै रोजी एजबॅस्टन येथे खेळला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.