भाजपाचे खासदार राम स्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कर्मचाऱ्यांने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली.
राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचं निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
खासदार शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने पोलिसांना ८.३० वाजता माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
दरम्यान काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या घटनेला काही दिवस लोटत नाही, तोच आणखी एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.