शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा पार पडली. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं होतं. आपल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, राज ठाकरे, किरीट सोमय्या, केतकी चितळे अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका मांडली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. केंद्र सरकार आता दाऊदच्या मागे लागले आहेत, पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो, तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्यांच्या मागे लागले असतील, ईडी, बीडी आहेत ती आमचीच लोकं आहेत, आमच्यात ये मग तुला मंत्री बनवतो. आणि बोलतील दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अशी भानगडी करणारी माणसं स्वत:ला हनुमान पूत्र तरी म्हणवू कशी शकतात. ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका पाडली होती. तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात. आणि तुमची वितभर नाही तर कित्येक मैल पळापळ झाली होती.
हनुमान पूत्र या गोष्टी तुमच्या तोंडात शोभत नाहीत. ज्या थाळ्या तुम्ही कोरोना काळात गो कोरोना गो म्हणून बडवल्या होत्या त्या थाळ्या आजही रिकाम्या आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
आमची पंचवीस वर्ष युतीमध्ये सडली कारण आम्ही ओळखलं नव्हतं, हा मित्र नाही हा शत्रू आहे. पण हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर त्याचा विद्रुप, बेसूर आणि भेसूर चेहरा आम्ही बघतोय, अजून आमचा विश्वास बसत नाहीए, हाच का तो मित्र ज्याला आम्ही जोपासलं होतं, ज्याला आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो,
किती भयानक पद्धतीने आणि वाईट पद्धतीने अंगावर येत आहेत. आम्ही कधी खालच्या भाषेत सामनात मोदींचा अपमान केला आहे का?
ही जर बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींचा राहिला आहे का? संवेदशनील भाजप आता गेला कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.