जळगाव जिल्ह्यात राजकारणात गेली 40 वर्षे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांची पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपात असताना खडसे एकेकाळी राज्याचे नेतृत्व करत होते. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा त्यांना फटका बसला. अशा वेळी संकटात सापडल्यावरही बहुजन समाजाचा नेता अशी स्वतःची नवी ओळख खडसेंनी निर्माण केली. पण असे असले तरी त्यांनी बहुजनच नाही तर त्यांच्या समाजातही कुटुंबीयांव्यतिरिक्त नवे पक्ष नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असा आरोप खडसेंवर केला जातो. खडसेंच्या राजकीय महत्वाकांक्षांना पक्षानेही वेसण न घातल्याने खडसेंचे आपोआपच शत्रू वाढत गेले. पर्यायाने आज पडत्या काळातही खडसेंची साथ कुणी द्यायला तयार नाही, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एवढ्यावरच न थांबता महानंदचे अध्यक्षही केले. मुलगी रोहिणी खडसे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केले. मराठा समाजाच्या नेत्यांना दूर सारत लेवा पाटीदार समाजाच्या महिलांना मानाची पदे पदरात पाडून घेतली. यामुळे खडसेंविषयी नाराजी पसरली. हेच कदाचित आज खडसे अडचणीत असतानाही त्यांच्या पाठीशी कुणीही ठामपणे उभे न राहण्याचे कारण असावे, असंही राजकीय विश्लेषक निरिक्षण नोंदवत आहेत.