आज दि.१६ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

 ‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे पोलीस प्रवेश परीक्षेसाठी व्यायाम करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले; दोघांची प्रकृती चिंताजनक

बुलढाण्यामध्ये एका विचित्र घटनेत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव मार्गावरील एसटी बसचा तुटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता. ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर असतानाच पोलीस प्रवेश परीक्षेसाठी सराव करणारे काही तरुण मॉर्निंगवाला जाताना हाताचे व्यायम करत रस्त्याच्या बाजूने संथ गतीने धावत होते. त्याचवेळी ही बस बाजूने गेली आणि दोन तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांपैकी एकाचा हात अगदी तुटून खाली पडल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद

गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४६५१ मिमी पावसाची नोंद झाली होती, यावेळी पावसाने पाच हजारचा टप्पा ओलांडला आहे. लोणावळ्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाल्याने पर्यटकासह शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत एकूण ४८५१ मिमी पावसाची नोंद झाली होती.पावसाच्या संततधारेमुळे तोच रेकॉर्ड यावर्षी मोडला गेला असून आत्तापर्यंत तब्बल पाच हजार १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात लोणवळामध्ये मुसळधार पाऊस पडत असून गेल्या २४ तासात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीची भिंत कोसळून ९ ठार; लखनऊमधील घटना

लष्कराच्या छावणीची भिंत कोसळून ९ जण जागीच ठार झाल्यायची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्यानंतर मलब्याखालून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरची ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर होते, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सक्षमीकरणावर अधिक भर ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

शासकीय योजनांचा लाभ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थीच्या सक्षमीकरणावर आणि त्याला आपल्या पायावर उभे करण्यावर अधिक भर दिला. तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांचा लाभ पोचविण्याचे प्रयत्न केले, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केले.

सर्वाना विश्वासात घेऊन व विचारविनिमय करून शासकीय निर्णय प्रक्रिया राबविण्याचे पंतप्रधान मोदी यांचे सर्वसमावेशक धोरण आहे, असेही सीतारामन यांनी नमूद केले. मुंबई भाजपने तयार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीविषयीच्या ‘सुशासनाची २० वर्षे ’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करा; माजी सरकारी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी माजी सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कारवाई करावी, असं म्हटलं आहे. गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आम आदमी पक्षासाठी काम करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप माजी सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.

पाकिस्तानची टीम निवडताना दमछाक, 3 जखमी खेळाडूंचा समावेश

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 16 ऑक्टोबर 2022 पासून ऑस्ट्रेलियात सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी 15 जणांची टीम जाहीर केली. या टीममध्ये 3 दुखापतग्रस्त खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका होत आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंची टीम वर्ल्ड कप कशी जिंकणार? असा प्रश्न विचारला जात आहे.शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान आणि फखर जमां या जखमी खेळाडूंचा टीममध्ये समावेश आहे. मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावर मिळवलेल्या विजयात शाहीनचा महत्त्वाचा वाटा होता. तो जुलै महिन्यापासून दुखापतग्रस्त आहे. या दुखापतीमुळे त्याला आशिया कप स्पर्धेतूनही बाहेर व्हावं लागलं होतं. ही दुखापत अद्याप बरी झालेली नसतानाच शाहीनची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झालीय.

लालबागच्या राज्याच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव, एक किलो मोदकाला सव्वा कोटी

मागच्या आठवड्यात गणरायाला आपण निरोप दिला मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणपती उत्सव थाटामाटात साजरा करता न आल्याने यंदा जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान कोरोनाचे निर्बंध हटवल्याने मानाच्या गणपतींचे दर्शनही खुले करण्यात आले होते. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भावीकांनी हजेरी लावली. या दरम्यान कित्येक भक्तांनी गणपतील दान स्वरुपात वस्तू दिल्या. त्या वस्तूंचा काल लिलाव करण्यात आला. या वस्तूंचा लिलाव कोट्यावधी किमतीच्या घरात गेला.

लालबागच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव काल (दि.15) करण्यात आला. जमा झालेल्या वस्तूंमध्ये एकूण एक कोटी तीस लाख रुपयांचा लिलाव झाला. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले होते. त्यात सोन्या चांदीच्या वस्तूंसहसह एक हिरो होंडाची बाईक देखील दान करण्यात आली होती. या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. आता गुरुवारी झालेल्या बैठकीतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथेच करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे.

भारतात कुठे आहे जगातील पहिलं शाकाहारी शहर, जेथे मांस खाण्यासाठी आहे पूर्णपणे बंदी?

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक प्राचीन आणि दिव्य धार्मिक स्थळं आहेत. गुजरात राज्यात अशा स्थळांची संख्या तुलनेनं जास्त आहे. गुजरातमधील पालिताना शहर हे शाकाहारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. 2014 मध्ये जनावरांच्या हत्येवर बंदी घालावी आणि कत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी सरकारकडे करत 200 पेक्षा जास्त जैन मुनी आणि संतांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर सरकारने हे शहर जगातलं पहिलं शाकाहारी शहर म्हणून घोषित केलं.

आलिया-रणबीरची जादू कायम; सातव्या दिवशीही बंपर कमाई

 ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे. हे नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाबाबत फारच कुतूहल आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडीत काढत जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान चित्रपटाच्या सातव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने रिलीज पूर्वीच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड ऊत्सुकता निर्माण केली होती. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 37 कोटींचा व्यवसाय केला होता. यामध्ये साऊथ व्हर्जनचे 5 कोटी रुपयेसुद्धा समाविष्ट होते. चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी 83 कोटींचा गल्ला जमवला होता. तर आंतराराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने तब्बल 225 कोटींचा आकडा पार केला होता.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.