फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून सूर्य चांगलाच तापल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागच्या 24 तासांत (दि. 25) पासून कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी जास्त झाले आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशांच्या पुढे जात आहे. तर किमान तापमानात घट झाली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान राज्यातील तापमान तीन अंशांनी घसरल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात किमान तापमान सरासरी 12.6 अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. थंड, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्याचा आकाशात संगम होऊन ढग घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तापमानात कमालीचे बदल होतील असे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
सूर्य तळपू लागल्याने दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असून, दोन दिवसांत पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तरेतील अतिशीत वारे दाखल होत आहेत. परिणामी रात्रीच्या तापमानात तीन अंशांनी घसरण झाली आहे. म्हणजेच थंड, उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्याचा आकाशात संगम होऊन ढग जमा होण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे.
आर्द्रता घटली आहे. मात्र, त्यात ढगाच्या आच्छादनामुळे आता वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमानही वाढेल. या बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी आरोग्य समस्यांतही वाढ होत आहे.
सुर्य तळपल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. शनिवारी (ता. 25) 24 तासांमध्ये अकोला येथे 38.1 अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील ब्रह्मपूरी, वाशीम, अमरावती, वर्धा, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड येथे 37 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर सांगली, रत्नागिरी, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर येथे 36 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.
दरम्यान निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस, जळगाव येथे 9.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 12 अंशांच्या पुढे होता. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.