दक्षिण आफ्रिका ‘शापमुक्त’, 30 वर्षांनी पुसला चोकर्सचा शिक्का; फायनलमध्ये इतिहास घडवणार?

दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेटमध्ये २४ फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल. महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ६ धावांनी हरवून फायनल गाठली. यासह दक्षिण आफ्रिकेने यासह कोणत्याही वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदा स्थान मिळवलं. १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आजपर्यंत अनेक वर्ल्ड कप खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेला एकदाही फायनल गाठता आलेली नव्हती.

महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ अशी ओळखच दक्षिण आफ्रिकेची बनली आहे. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकन संघावर नेहमीच चोकर्सचा शिक्का बसला आहे. पण आता हा शिक्का पुसला गेलाय. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने वुमन्स टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात इंग्लंडला हरवून फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात दक्षिण आफ्रिकेची अखेर त्या शापातून सुटका झाली अशी चर्चा आहे.

दक्षिण आफ्रिकेनं पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना १९९१ मध्ये खेळला त्यानंतर १९९२ पासून ते २०२२ पर्यंत दहा वेळा दक्षिण आफ्रिकेचा पुरुष आणि महिला संघ सेमीफायमलमध्ये पोहोचला. पण त्यांना एकाही सेमीफायनलमध्ये विजय मिळवता आलेला नाही. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानतंर थेट 1999 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका पोहोचली होती. मात्र सेमी फायनलचा सामना टाय झाला, पण गुणांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. महिला संघाने २००० च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. तिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला होता. तर 2009च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.

२०१४ पासून २०२२ पर्यंत सहा वेळा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष आणि महिला संघाने सेमीफायनल गाठली होती. पण सहाही वेळा त्यांच्या पदरी निराशा पडली. 2014 वुमन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. तर 2014 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून 6 विकेट्सनी पराभव झाला. यानंतर 2015च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्यांना न्यूझीलंडने पराभवाचा धक्का दिला. २०१७ नंतर महिलांचा संघ आतापर्यंत चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. यात 2017च्या वुमन्स वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून पराभव झाला. तर 2020च्या वुमन्स टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला होता. गतवर्षी 2022च्या वुमन्स वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडने हरवलं होतं. आता २०२३ च्या वुमन्स वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय.

सेमीफायनलमध्ये सामना गमावण्याची ही नकोशी परंपरा अखेर खंडित झाली. गेल्या ३० वर्षांत चोकर्सचा बसेलला शिक्का अखेर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पुसून टाकला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनल गाठली असली तरी आता त्यांची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे. पाच वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याविरुद्ध फायनल जिंकून दक्षिण आफ्रिका इतिहास घडवणार की ऑस्ट्रेलिया त्यांचा दबदबा कायम राखणार याचं उत्तर रविवारी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.