गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल झाली.आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 17, आपला 5 आणि इतर पक्षांना 4ठिकाणी आघाडी मिळाली आहे.भाजप लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल, तसंच भाजप काँग्रेसचा 1980 सालचा विक्रमही मोडीत काढेल. 1980 साली माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 183 पैकी 149 जागांवर विजय मिळवला होता.
भाजपच्या विजयाची कारणं
2017 सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली, त्यामुळे भाजपला 100 जागांचा आकडाही गाठता आला नव्हता. 2017 च्या निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागांवर विजय मिळवला, यावेळी मात्र भाजपने जातीय समिकरणांचा योग्य वापर करत जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे.
ओबीसींची गणीत
गुजरातमध्ये 185 मतदारसंघांपैकी 75 ओबीसी प्राबल्य असलेले मतदारसंघ आहेत. यातल्या तब्बल 64 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या जागांमध्ये तब्बल 25 ने वाढ झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसला मात्र इकडे 8 जागांवर आणि आपला 2 तर इतर पक्षांना एका जागेवर आघाडी मिळाली आहे. ओबीसी समिकरणामध्ये सर्वाधिक नुकसान हे काँग्रेसचं झालं आहे, कारण त्यांच्या तब्बल 26 जागांवरची आघाडी कमी झाली आहे.
पाटीदार भाजपकडे
ओबीसी समाजाप्रमाणेच पाटीदार समाजाची मतंही भाजपकडे गेल्याचं चित्र सध्याचा निकालावरून दिसत आहे. गुजरातमध्ये 182 पैकी 39 जागांवर पाटीदार समाजाचं प्राबल्य आहे. या 39 जागांपैकी भाजपला 34 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या जागांमध्ये 12 ने वाढ झाली आहे. तर काँग्रेसला पाटीदार बहुल भागात फक्त 3 जागांवर आघाडी आहे. 2017 च्या तुलनेत काँग्रेसला या भागात 14 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. आपला या 39 मतदारसंघांपैकी 2 ठिकाणी आघाडी मिळाली आहे.
ग्रामीण भागात मुसंडी
ग्रामीण भागातही भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गुजरातमध्ये 182 पैकी 98 जागा या ग्रामीण भागात येतात, यातल्या 80 जागांवर सध्या भाजपकडे आघाडी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ही आघाडी 41 ने जास्त आहे. तर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. फक्त 10 जागांवरच काँग्रेसकडे सध्या आघाडी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला तब्बल 43 जागांचा फटका बसला आहे. आपला ग्रामीण भागात 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.
शहरी भागातही वाढ
गुजरातच्या शहरी भागातही भाजपने त्यांची जुनी कामगिरी कायम ठेवली आहे. 182 पैकी 53 जागा या शहरी भागात येतात, यातल्या 50 जागांवर भाजप पुढे आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला इकडे 6 जागांचा फायदा झाला आहे. तर काँग्रेसचं 6 जागांचं नुकसान झालं आहे. शहरी भागात काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे.
1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, यानंतर आता लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे. भुपेंद्र पटेल हे पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याआधीच केली आहे.