शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. गद्दार सत्तेत बसल्यामुळे महाराष्ट्रातील पाच महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही आणलेला रोह्यातील बल्क ड्रग पार्क प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला. बेळगाव प्रश्नावर आज कोणी बोलत नाही, तिथे मंत्री जाणार होते ते तिकडे गेले नाहीत. हे सरकार घाबरट सरकार आहे. राज्यात महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, मूलभूत प्रश्न सोडून राजकारण दूषित करण्याचं काम सुरू आहे, अशा शद्बात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे.
राज्यपालांवर निशाणा
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या निर्णयाला आम्ही आव्हान दिलेले आहे. आम्ही भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल मानत नाहीत. त्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्यात अनेक राज्यपाल होऊन गेले, मात्र असे राजकीय राज्यपाल आम्ही कधी पाहिले नाहीत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया
शिवसेना नेते संजय राऊत यांना आलेल्या धमकीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाच्या अनेक लोकांना धमक्या येत आहेत. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला. राजकीय नेत्यांचे संरक्षण काढले की त्यांना धमक्या येतात, हे लोकशाही व देशाला घातक आहे. राजकीय लोकांवर दबावतंत्र येते तसे माध्यमांवर देखील दबावतंत्र येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.