भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले. यानंतर आता उदयनराजे भोसले आज म्हणजेच 9 डिसेंबरला सकाळी 8.15 मिनिटांनी पंतप्रधान कार्यालयात जाणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयात उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या मुद्यावरून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत तक्रार करणात आहे. उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयातल्या बैठकीनंतर दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी उदयनराजे भोसले पत्रकार परिषद घेणार आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या या विधानाविरोधात उदयनराजे यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं होतं. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशाराही उदयनराजे भोसलेंनी रायगडावरून दिला होता.
उदयनराजेंचा भाजपलाही इशारा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर स्वस्थ बसणार नाही. माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी पक्षीय कारवाईला देखील घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये, असा आक्रमक पवित्रा उदयनराजेंनी घेतला.
प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं.