भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचची क्रिकेट रसिक अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही देश क्रिकेटमध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन्ही देशांदरम्यान राजकीय संबंध ठीक नसल्याने त्याचा परिणाम साहजिकच क्रिकेटवर पाहायला मिळतो. अजूनही हे दोन्ही देश केवळ आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध क्रिकेट मॅचेस खेळतात. काही महिन्यांपूर्वी या देशांच्या क्रिकेट टीम आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2022 मध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्या होत्या. मात्र आगामी आशिया कपच्या अनुषंगानं BCCIचे सचिव जय शहा यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. या विधानाचे क्रिकेटविश्वात जोरदार पडसाद उमटले असून त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCBनं अधिकृत उत्तर दिलं आहे.
आशिया कप पाकिस्तानात, बीसीसीआयचा नकार
आगामी आशिया चषक स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं आहे. पण BCCI चे सचिव जय शहा यांनी मंगळवारी ‘टीम इंडिया आशिया कप 2023 साठी पाकिस्तानात जाणार नाही. आशिया कपसाठीच्या मॅचेस एखाद्या तटस्थ ठिकाणी खेळवल्या जातील’ असं विधान केलं होतं. याच विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं विरोध दर्शवला आहे. शाह यांचं हे विधान नियमांविरुद्ध आहे त्यामुळे त्या अनुषंगाने तातडीनं आशियाई क्रिकेट कौन्सिलची बैठक बोलवायला हवी अशी मागणी पीसीबीनं केली आहे.
आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हादरलं आहे. तशा आशयाचं निवेदन आज पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जारी करण्यात आलं. जय शहा यांनी आशिया कप स्पर्धा तटस्थ ठिकाणी घेण्यासंदर्भात केलेलं विधान निषेधार्ह आहे. मंडळाच्या कोणत्याही सदस्यासोबत न बोलता यजमानांशी चर्चा न करता केलेलं हे विधान खेदजनक आहे. याचे खूप मोठे परिणाम होऊ शकतात. असं पीसीबीनं म्हटलंय. दरम्यान जय शाह हे बीसीसीआयचे सचिव तसेच आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर जय शहा म्हणाले होते की पुढच्या वर्षी टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. आशिया कप स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात मॅच नाही
पाकिस्तानातील सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ कोणत्याही स्वरुपाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळली गेलेली नाही. अलीकडेच काही संघ तिथं जाऊन क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज सारख्या टीमनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. पण पाकिस्तानात जाण्यास किंवा त्याच्यासोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळण्यास भारताचा सातत्याने विरोध आहे. आगमी टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान टीम 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये आमनेसामने येतील.
यादरम्यान आगामी आशिया कप 2023 संदर्भात जय शाह यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. या अनुषंगानं पीसीबीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत दीर्घ चर्चा आणि समर्थनानंतर आशिया कप पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता जय शाह यांचं विधान या गोष्टींचं उल्लंघन करणारं आहे. 1983 मध्ये आशियाई क्रिकेट काऊन्सिलची ज्या उद्देशानं स्थापना झाली होती हे विधान त्याच्या विरोधात आहे. अशा विधानामुळे क्रिकेट खेळणाऱ्या आशियाई देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो असं पीसीबीनं म्हटलंय.