पावनखिंड’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड

कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांचा परिणाम सर्वच क्षेत्रांना झाला. चित्रपटसृष्टीलाही मोठा फटका सहन करावा लागला. अद्यापही महाराष्ट्रात सिनेमागृह हे ५० टक्के आसनक्षमतेने सुरू आहेत. असं असतानाही मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. झिम्मा, पांडू, झोंबिवली, लोच्या झाला रे या चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यानंतर ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असल्याचं कळतंय. हा आकडा पुढील दिवसांत निश्चितच वाढणार आहे.

पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी १.१५ कोटी रुपये, शनिवारी २.०५ कोटी रुपये आणि रविवारी तीन कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे वीकेंडला जवळपास सहा कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. सिंगल स्क्रीन्सवरही हाऊसफुल शो सुरू असल्याने नेमका आकडा अद्याप समोर आला नाही. प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मल्टिप्लेक्समधीलही शो वाढवण्यात आले आहेत. रविवारी महाराष्ट्रात तब्बल १९०० शोज लावण्यात आले. सोमवारीसुद्धा शोजचा आकडा अबाधित राहिला. या आठवड्यात संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॅाकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. त्यातच ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या यशस्वी चित्रपटांमुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.