आठ तासांच्या चौकशीनंतर
नवाब मलिक यांना ईडीने अटक
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतंं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
त्यांनी सुरुवात केली, त्याला आता
शेवटापर्यंत न्यावे लागेल : फडणवीस
नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
यंत्रणेचा गैरवापर केला जात
असल्याचं हे उदाहरण : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून टीका केली आहे. यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी बोलताना म्हटलं आहे.
रशियाविरोधात उचलली
अमेरिकेने कठोर पावले
युक्रेन आणि रशियाच्या संकटादरम्यान अमेरिकेने रशियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसच्या भाषणात याबाबत मोठी घोषणा केली आहे. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची ही सुरुवात आहे. परिस्थितीचे आकलन करून आम्ही पावले उचलत आहोत. युक्रेनला मदत करण्याचे आमचे सर्व प्रयत्न हे बचावात्मक उपाय आहेत, रशियाशी युद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही, असे बायडेन यांनी म्हटले आहे
दहावी आणि बारावीच्या
परीक्षा ऑफलाईनच
सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन अर्थात प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊनच होतील, असं न्यायालयानं आपल्या निकालामध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या परीक्षा ऑफलाईनच होतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा निकाल देताना न्यायालयानं संबंधित याचिकाकर्त्यांना परखड शब्दांमध्ये फटकारलं देखील आहे.
गुजरातमध्ये ६००० कोटींचा
कोळसा घोटाळा
गुजरातमध्ये ६००० कोटींचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या १४ वर्षांत राज्यातील लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योगांना कोळसा देण्याऐवजी अनेक संस्थांनी इतर राज्यातील उद्योगांना चढ्या दराने विकला. यामध्ये ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गुजरात सरकारच्या संस्थानी राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) नावाने कोळसा मागवला पण तो इतर राज्यांना महागड्या किमतीत विकला. चारा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचे म्हणत काँग्रेसने यामध्ये कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चंदीगड शहर मागील
३६ तासांपासून अंधारात
पंजाब आणि हरियाणाची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असलेलं चंदीगड मागील ३६ तासांपासून अंधारात गेलंय. देशातील सर्वात सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या चंदीगडमध्ये वीज आणि पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. वीज महामंडळाच्या खासगी करणाविरोधात कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर ही स्थिती तयार झाली आहे. सोमवारपासून (२१ फेब्रुवारी) ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ट्रॅफिक सिग्नलपासून रुग्णालयातील लाईफ सपोर्ट सिस्टमपर्यंत यंत्रणा ठप्प झाली आहे. शहरात वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक रुग्णालयांनी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.
हिजाब बंदीसाठी संपूर्ण
देशात कायदा केला पाहिजे
कर्नाटकमधील हिजाब वादाबद्दल उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हिजाब बंदीसाठी संपूर्ण देशात कायदा केला पाहिजे, अशी मागणी साक्षी महाराजांनी केली आहे. युपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी उन्नावमध्ये मतदान करण्यासाठी आलेले साक्षी महाराज म्हणाले की, “निवडणुकीत हिजाबचा मुद्दा हा विरोधकांनी आणला आहे.” ते म्हणाले, “मला वाटते की संपूर्ण देशात हिजाबवर बंदी घालण्यासाठी कायदा केला पाहिजे.” तर मतदानाबाबत साक्षी महाराज म्हणाले, “उन्नावमध्ये भाजपाला ६ पैकी ६ जागा मिळतील.
मराठी पाट्यांविषयी व्यापारी
संघटनेची याचिका फेटाळली
मराठी पाट्यांविषयी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या व्यापारी संघटनेला न्यायालयानं फटकारलं आहे. यासंदर्भात व्यापारी संघटनेनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं त्यांच्या विरोधात राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयानं देखील योग्य ठरवलं आहे. राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्ये जारी आदेशांनुसार राज्यातील सर्व दुकानांवर इतर भाषांसोबतच मराठी भाषेत देखील पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते.
शेअर मार्केटमध्ये नुकसान,
अस्वस्थ तरुणाची आत्महत्या
शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीमुळे अस्वस्थ झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. मुंबईतल्या वांद्रे येथील तरुणाने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. वांद्रे (पूर्व) येथील साई धाम सोसायटीत ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या तरुणाचा भाऊ त्याच खोलीत झोपला असताना मयंक जयेश गाला याने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.
देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा ‘आधार’, महाराष्ट्रातील शेतकरी पिछाडीवर
प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किमंत मिळावी या उद्देशाने देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र ही सुरु केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान होत नाही. अन्यथा खुल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागते. 2021-22 मधील खरीप हंगामात या माध्यमातून सरकारने 696 लाख मेट्रीक टन धान्याची खरेदी केली आहे. पंजाब राज्यात 1 कोटी 86 लाख मेट्रीक टनाची खरेदी करण्यात आली. हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरातील सुमारे 94.15 लाख शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीवर धानाची विक्री सरकारला केली आहे. त्यांच्या पिकाच्या मोबदल्यात 1 लाख 36 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये हमीभावाने धान्याची खरेदी सुरु आहे.
SD social media
9850 60 35 90