आज दि.२६ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीय. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू झाल्याने जवळपास ५० नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.

अजित पवारांचा ‘तो’ मुद्दा फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच निकाली काढला; थेट कंपनीचा परवानाच रद्द

एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यातच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडीओ दाखवून त्याची व्यथा मांडली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ दखल घेत 2 रुपयांचा चेक देणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे. अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.512 किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. याचा व्हिडीओ तयार करुन शेतकऱ्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाठवला होता. यानंतर पवारांनी माध्यमांसमोर या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती. याची दखल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. सूर्या ट्रेडींग कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमी प्रतीच्या कांद्यातून वाहतुकीचा खर्च करता येणार नाही. असा खर्च वजा करुन 2 रुपये चेक देणाऱ्या सूर्या ट्रेडींग कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कांदा निर्यात होणाऱ्या तिन्ही देशात परकीय चलनाची तूट आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्यास अडचण आहे. भारताशेजारील तिन्ही देशात परकीय चलनाची तूट असल्याने कांद्याचे दर घसरल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

पक्षांतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून संपूर्ण पक्ष गेला. मात्र, त्यानंतरही पक्षात  अंतर्गत धुसफूस थांबण्याचं नाव घेतना दिसत नाही. ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या विरोधात ठाकरे गटाचेच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बबनराव घोलप यांनी उत्तरनगर जिल्ह्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून त्या जागी केलेल्या नवीन नियुक्त्या मान्य नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आज राहाता येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोलप यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे.

‘श्रीमंत’ भिकारी! पोटासाठी भीक मागूनही असं काम, पैसेवाल्यांनाही वाटेल लाज; दान केले 50 लाख

प्रत्येक जण जे काही करतो ते आपलं पोट भरण्यासाठी करतो. कुणी व्यवसाय करतो, कुणी नोकरी करतं, कुणी मजुरी करतं, तर कुणी आपलं कौशल्य वापरून पैसे कमवतो. ज्यांना काहीच शक्य नाही किंवा परिस्थितीसमोर त्यांचं काहीच चालत नाही, ते भीक मागून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका भिकाऱ्याने भीक मागून जे काम केलं, जे कित्येक पैसेवालेही करत नाहीत. भिकाऱ्याची श्रीमंती पाहून श्रीमंताना लाज वाटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका भिकाऱ्याने चक्क 50 लाख रुपये दान केले आहेत.

तामिळनाडूतील एक भिकारी जो गेली कित्येक वर्षे भीक मागून आपलं पोट भरतो आहे. त्याने भीक मागून मागून जमा झालेले आपले 50 लाख रुपये दान केले आहेत. पुलपांडियन असं या भिकाऱ्याचं नाव आहे. 72 वर्षांचा पुलपांडियन तुतूकडी जिल्ह्यातील आहे. त्याने सीएम रिलीफ फंडमध्ये गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी लाखो रुपये दान केले आहेत.

 ‘चंद्रमुखी’ नंतर ‘कलावती’ बनून प्रेक्षकांना घायाळ करायला येतेय अमृता खानविलकर!

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी हे प्रमुख पात्र उत्तमरित्या साकारलं. अमृताच्या अदांनी सगळेच घायाळ झाले होते.विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कांदबरीवरील आधारित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतील उतरला.आता अमृताने नुकतीच नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.अमृता खानविलकर येणाऱ्या काळात ‘कलावती’ या सिनेमात झळकणार आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.अमृताने नव्या सिनेमाची घोषणा करताच तिच्यावर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता तिला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

रितेश देशमुख ते सोनू सूद; क्रिकेटच्या मैदानावर सेलिब्रिटींचा जलवा

मुंबई हिरोज या संघात बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. अभिनेता रितेश देशमुख हा या संघाचा कर्णधार असून यासह शरद केळकर, सुनील शेट्टी, सोहेल खान, माधव देवचक्के यासारखे अनेक स्टार्स CCL 2023 मध्ये आहेत.तसेच किच्चा सुदीप आणि अखिल अक्किनेनी यासारखे कलाकार देखील CCL 2023 मध्ये क्रिकेट खेळणाना दिसत आहेत.सध्या या स्पर्धेत आतपर्यंत 13 सामने खेळवले गेले असून यात प्रत्येकी 2 सामने जिंकून भोजपुरी दबंग आणि तेलगू वॉरियर्स हे संघ आता सर्वोच्च स्थानी आहे.सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे सामने जयपूर, हैदराबाद, रायपूर, जोधपूर, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम या प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जात आहेत.सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण झी अनमोल सिनेमा हिंदी, झी अनमोल सिनेमा पिक्चर्स इंग्लिश, झी थिराई तमिळ, झी सिनेमालु तेलुगू, झी पिक्चर्स कन्नड, प्लावर्स टीव्ही मल्याळम, पीटीसी पंजाबी, झी बांगला सिनेमा आणि झी भोजपुरी या चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार

अदानींशी तुमचे नाते काय, एवढेच मी पंतप्रधान मोदींना लोकसभेत विचारले होते. त्यांनी खरेतर नाते नाही, असे सांगायला हवे होते. पण, मी मोदींना प्रश्न विचारताच केंद्रातील सर्व मंत्री, भाजपाचे खासदार अदानींच्या बचावासाठी उभे राहिले. मोदींचे अदानींशी नाते आहे. अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी रायपूरमधील काँग्रेसच्या महाअधिवेशनातील भाषणात केला.

छत्तीसगडमध्ये  तीन पोलीस शहीद

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सहायक उपनिरीक्षकासह दोन जिल्हा राखीव रक्षक जवान (डीआरजी) शहीद झाले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ‘डीआरजी’ पथक शोध मोहिमेवर असताना जगरगुंडा व कुंदेड गावांदरम्यान सकाळी नऊच्या सुमारास ही चकमक उडाली, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर श्रेणी) सुंदरराज पी. यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की राजधानी रायपूरपासून चारशे किलोमीटरवर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने कारवाई सुरू केली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात सहायक उपनिरीक्षक रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा व वंजाम भीमा यांचा शहीद झाले.

नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद : शहा

‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) हातमिळवणी केली आहे,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. नितीशकुमारांची ही महत्त्वाकांक्षा दर तीन वर्षांनी उचल खाते, अशी टीकाही शहा यांनी केली.पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया येथे जाहीर सभेत  शहा बोलत होते. ते म्हणाले, की तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यास नितीशकुमार यांची सहमती आहे. त्यांना ते कधी करायचे आहे ते त्यांनी जाहीर करावे. नितीशकुमार यांनीही बिहारला ‘जंगल राज’मध्ये ढकलल्याचा आरोप करून शहा म्हणाले, की आधीच्या काँग्रेस व राजद सरकारने बिहारला जंगल बनवल्याचा आरोप नितीशकुमारच करत असत. आता त्यांचे आयाराम-गयाराम खूप झाले. नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे  कायमचे बंद झाले आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.