भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण(वय-९७) यांचे (मंगळवार) निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.
शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. आजची पिढी भलेही त्यांना आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखत असेल, मात्र त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते राज्यसभा खासदारही होते. सहा वर्षे ते भाजपामध्ये राहिले होते.
शांती भूषण आणि त्यांचे पुत्र प्रशांत भूषणही आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. मात्र कालांतराने हे दोघेही आम आदमी पार्टीपासून दूर झाले होते.