रशिया आणि यूक्रेनमधील संघर्ष आता अधिक तीव्र झालाय. रशियाचे लढावू विमान, हेलिकॉप्टरद्वारे यूक्रेनवर मिसाईल हल्ला केला जातोय. त्यामुळे यूक्रेनमध्ये मोठी चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती पुतिन यांनी यूक्रेनबाबत सध्यस्थितीच्या घटनाक्रमांची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि नाटो गटातील मतभेद केवळ चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात हा दृढविश्वासाचा पुनरुच्चार केल्याची माहितीही पीएमओने दिलीय.
तसंच पंतप्रधान मोदी यांनी हा हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केलं आणि सर्व बाजूंनी राजनैतिक संवाद आणि चर्चेतूनच तोडगा काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चर्चेचून तोडगा काढण्याचं आवाहन करण्यासोबतच यूक्रेनमधील भारतीय नागरिक, खास करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या चिंतेविषयी पुतिन यांना माहिती दिली. तसंच भारत त्यांची सुरक्षा आणि त्यांना सुखरुपपणे भारतात परत आणण्यास प्राधान्य देत असल्याचं मोदींनी सांगितलं. तसंच यावेळी दोन्ही नेत्यांनी मान्य केलं की त्यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी गट सामयिक हिताच्या मुद्द्यावर एकमेकांशी नियमित संपर्कात असतील.
तत्पूर्वी भारतातील यूक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षात भारताने हस्तक्षेक करावा अशी मागणी केली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करावी असा आग्रह धरलाय. पोलिखा म्हणाले की, ‘सध्या यूक्रेनची अवस्था पाहता भारताने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. भारत आता एक पॉवरफूल ग्लोबल प्लेयर आहे. त्यामुळे भारताने अन्य मोठ्या देशांप्रमाणे या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक आहेत. जगातील सर्वच देशांचे नेते त्यांचा पूर्ण सन्मान करतात. भारत आणि रशियाचेही मैत्रिपूर्ण संबंध आहेत’.