राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा धुसफुस पाहायला मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी निधी वाटपावरून अनेकदा तक्रारीही केल्या. भाजपकडून अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत, तशी माहिती मिळतेय.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरुन शिवसेना नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नेत्यांनी तर मुख्यमंत्र्यांनी गृहखातं आपल्याकडे ठेवावं अशी मागणी केली. दुसरीकडे निधीवाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार उघडपणे जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातं.
तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र सरकारचा कारभार सुरुळीतपणे सुरु असल्याचा दावा करत, हे सरकार पाच वर्षे टीकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. असं असलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यातच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला होता. विरोधकांनी पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्यभरात हे प्रकरण गाजल्यानं सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला.
तर 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला. सध्या देशमुख हे कोठडीतच आहेत.
दुसरीकडे भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांची मालिका सुरुच आहे. महाविकास आघाडीतही अंतर्गत नाराजी सुरु असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळतेय.