भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले. भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत.
सोमवारी आर. नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याने जर्मनीच्या मॅक्सिमिलियन उल्ब्रिचचा १६-८ असा पराभव केला. मानांकन फेरीतही रुद्रांक्षने २६२ गुणांचा वेध घेत अव्वल क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. उल्ब्रिचचे २६०.६ गुण होते. त्यापूर्वी पात्रता फेरीत ६२९.३ गुण मिळवत रुद्रांक्ष सातव्या क्रमांकाने मानांकन फेरीसाठी पात्र ठरला होता.
सुवर्णपदकाच्या लढतीत पहिल्या सात फैऱ्यानंतर रुद्रांक्ष आणि उल्ब्रिचमध्ये ७-७ अशी बरोबरी होती. मात्र, पुढील तीनही फैऱ्यांमध्ये रुद्रांक्षने सरशी साधताना १३-७ अशी आघाडी मिळवली. अखेरीस रुद्रांक्षने लढतीत १६-८ असा विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. भारताचे दिव्यांश सिंह पन्वर आणि हृदय हजारिका हे अन्य दोन नेमबाज पात्रता सिद्ध करू शकले नाहीत. भारतीय नेमबाजांनी सोमवारी एअर रायफल आणि पिस्तूल प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते. यामध्ये नर्मदा-रुद्रांक्ष जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. वरुण तोमरने पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वरुणने रिदम संगवानच्या साथीने १० मीटर पिस्तूल प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्ण यश मिळवले.