अहमदनगर जिल्ह्यात जोरदार गारपीट

अहमदनगर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर, नेवासा (Nevasa) तालुक्यात जोरदार गारपीट झाली असून या भागातील शेतकऱ्यांचं या गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय. गोदावरी नदी किनाऱ्याच्या गावात गारपिटीनं तडाखा दिलाय. श्रीरामपूर, नेवासासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील काही गावातही अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगरच्या श्रीरामपूर, नेवासा आणि वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये गारपीट झाली. या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू आणि हरबऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अचानक झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. राज्यातील सुरु असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलंय. मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलं आहे.

दरम्यान, राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही काही भागात गारपीट झाल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरात गारपिटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. अकोला शहरांच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसासोबत गारपीटही झाली आहे. सकाळपासूनच अकोला शहरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारनंतर अकोला शहरात जोरदार पाऊस झाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात उद्या (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरलाय. मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असून महाराष्ट्रात आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला होता.

दरम्यान, 29 डिसेंबरला पूर्व विदर्भात ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर चंद्रपूरला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.