पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात तब्बल 28 मुलींना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या मुलींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जेवणातून या मुलींना विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्व मुली सॉफ्टवेअर इंजिनिअरींग (Software Engineering) शिक्षण घेणाऱ्या असून त्या शिक्षणासाठी पुण्यातील भोर तालुक्यातल्या खोपी इथं राहात होत्या.
भोर तालुक्यातील खोपी गावात असलेल्या एकूण 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. यातील एकूण 16 मुलींना उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या 28 मुलींपैकी सात मुलींची प्रकृती अधिक खालावल्यानं त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या सर्व मुली खोपी गावातील फ्लोरा इन्स्टिट्यूटमधील इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनी आहेत.
खोपी गावातील सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींनी रविवारी रात्री घरीच बनवून खाल्लं होतं. दरम्यान, सुरुवातील पाच मुलींना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना उपसाराठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र नंतर आणखी काही मुलींची प्रकृती बिघडून हा आकडा 28 पर्यंत पोहोचला. या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज रुग्णालायतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सध्या विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर प्रकृती खालावलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.