पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वीच गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या झालेली असताना सुरक्षेत चूक राहिल्याचे आणखी एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाली आहे. त्यांचा सुरक्षेचा ताफा वाट चुकला आणि 20-25 मिनिटे पटियालाच्या रस्त्यांवरच फिरत राहिला. अखेर काँग्रेस नेते कोणत्याही सुरक्षेशिवाय मुसेवाला यांच्या घरी पोहोचले.
चंदिगड विमानतळावरून मानसाला जाण्यासाठी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख राजा वाडिंग यांनी राहुल गांधींना कारमध्ये बसवले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये प्रतापसिंग बाजवाही उपस्थित होते. आता असे झाले की, राहुल गांधी ज्या गाडीत बसले होते, ती गाडी दुसरा मार्ग निवडत बायपासवरून थेट संगरूर मानसा रोडवर गेली. पण राहुल गांधींच्या सुरक्षा ताफ्याला याची माहिती मिळाली नाही आणि त्यांची दोन वाहने चुकून बायपास कोना वळणावरून पटियाला शहरात गेली.
यानंतर सुरक्षेची दोन्ही वाहने सुमारे 20 ते 25 मिनिटे पटियाला शहरात फिरत राहिली. तोपर्यंत राहुल गांधी त्यांच्या साथीदारांसह मुसा गावात पोहोचले आणि त्यांनी गायकाच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. राहुल गांधींच्या सुरक्षेच्या ताफ्याला बराच वेळ रस्ता सापडला नाही. तेव्हा पटियाला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली आणि त्यांची कार शहराच्या मध्यभागातून काढून संगरूर मानसा रोडवर आणली. त्यानंतर त्यांचा ताफा मुसा गावात पोहोचला.
यापूर्वीही अशीच चूक
आता चिंतेची बाब म्हणजे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतही मोठी चूक झाली होती. तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि विधानसभा निवडणुकीची वेळ चालू होती. पीएम मोदी रॅलीसाठी जात असताना मधल्या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या निदर्शनामुळे त्यांचा ताफा बराच वेळ तिथेच अडकून पडला होता. नंतर या प्रकरणाची चौकशी झाल्यावर पंजाब पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आणि तत्कालीन राज्य सरकारकडून स्पष्टीकरणही मागवण्यात आले होते.
सलमान खानलाही धमकी
सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली आहे. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. असं असूनही सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचं एक पत्र मिळालं आहे. यानंतर, त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.