जीवनशैलीतल्या बदलामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतात. केवळ दगदग, कामाचा ताण, अवेळी जेवण यामुळेच आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत, तर बदलत्या ऋतुमानाचाही शरीरावर परिणाम होत असतो. यासाठी कोणत्या ऋतूत आहार कसा असावा याबद्दलची माहिती आयुर्वेदात दिलेली आहे. सध्या संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात थंडी सुरू झाली आहे. यामुळे सर्दी, ताप यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवतातच. परंतु, हिवाळ्यात शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. वयोमानानुसार युरिक अॅसिडच्या समस्येत वाढ होते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणं गरजेचं असतं. योग्य आहारदेखील तितकाच महत्त्चाचा असतो. युरिक अॅसिडची समस्या असणार्यांनी आहारात बदल करणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.
युरिक अॅसिड प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात निर्माण होतं. वयानुसार किंवा तब्येतीनुसार याचं प्रमाण अनियंत्रित होतं. युरिक अॅसिड वाढल्यास अनेकांना उठण्या-बसण्यात अडचणी निर्माण होतात. युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास गुडघेदुखी वाढते. किडनीद्वारे हे युरिक अॅसिड शरीराबाहेर फेकलं जातं. प्युरीनयुक्त पदार्थांमुळे शरीरातल्या प्युरिनचं प्रमाण वाढतं. किडनीची कार्यक्षमता क्षीण झाल्यास हे अॅसिड शरीराबाहेर फेकलं जात नाही. परिणामी, गुडघ्यानजीकच्या स्नायूंमध्ये क्रिस्टल स्वरूपात ते साठून राहतं. आहारातल्या प्युरिनयुक्त पदार्थांमुळे शरीरातलं युरिक अॅसिड अर्थात आम्ल वाढतं. यामुळे गाऊट अॅटॅक अर्थात सांधेदुखीला सुरुवात होते. युरिक अॅसिडचं प्रमाण खूप वाढलं तर किडनीच्या समस्या, हार्ट अॅटॅक या तक्रारीही उद्भवतात. यासाठी शक्यतो प्युरिनयुक्त पदार्थ खाणं टाळा. युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार कसा असावा हे जाणून घेऊ या.
हिरव्या भाज्यांचं सेवन
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचं सेवन हितावह ठरतं. हिवाळ्यात गाजर, बीट, पुदिना, टोमॅटो, काकडी, कांदा यांचं सेवन उपयुक्त ठरतं. या भाज्यांमधली व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरास हितावह ठरतात. त्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात राहतं. तसंच हाडांना येणारी सूजही नाहीशी होते.
लिंबू आणि टोमॅटोचं सेवन
लिंबू आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे युरिक अॅसिडचं प्रमाण आटोक्यात राहतं. लिंबू आणि टोमॅटोचा आहारात समावेश केल्यास युरिक अॅसिड शरीराबाहेर टाकण्याचं कार्य सुलभ होतं. यासाठी लिंबू आणि टोमॅटोचा समावेश फायदेशीर ठरतो.
प्युरिनयुक्त भाज्या आहारात नकोत
युरिक अॅसिडच्या समस्येवर उपचार घेणार्यांनी प्युरिनयुक्त भाज्या आहारात घेणं घातक ठरतं. यामुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. फ्लॉवर, कोबी, हिरवे वाटाणे, बीन्स, भेंडी आणि मशरूम खाल्ल्याने शरीरातलं युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. म्हणून युरिक अॅसिडची समस्या असलेल्यांनी या भाज्यांचं सेवन करू नये.
बटाटा खाणं ठरतं हितावह
युरिक अॅसिडचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी बटाटा खाणं उपयुक्त ठरतं. बटाटा हा पिष्टमय पदार्थ असल्याने त्यात फॅट्सचं प्रमाण खूप असतं. तसंच कार्ब्जचं प्रमाणही खूप असतं. यासाठी अनेकजण बटाट्याचे पदार्थ खाणं टाळतात. परंतु, बटाट्याचा रस आहारात असल्यास युरिक अॅसिड आटोक्यात राहतं.