आज दि.२० सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नवरात्राच्या तोंडावर अंबाबाईच्या पेड दर्शनावरून वाद, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

अंबाबाई मंदिरात पेड दर्शनावरून वाद निर्माण झालाय. हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यानंतरही जिल्हाधिकारी या निर्णयावर ठाम आहेत. देवीच्या दारात गरीब श्रीमंत भेद यामुळे निर्माण होईल त्यामुळे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात पेड दर्शनाचा निर्णय घेण्यात आलाय. 200 रुपये आकारून तासाला एक हजार लोकांना दर्शन देण्यात येणार आहे, मात्र देवीच्या दारात दर्शनाचा बाजार व्हायला नको आणि गरीब आणि श्रीमंत भेद नको म्हणून याला विरोध होत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार मात्र या निर्णयावर ठाम असून भाविकांच्या सोयीसाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केलाय

खेळता खेळता बाळाने नेलकटर गिळलं

तुम्ही लहान मुलांना शांत राहण्यासाठी नजरचुकीने खेळण्यासाठी कोणतीही वस्तू देता. ते बाळ शांत राहिल्यावर तुम्ही तुमच्या कामात लागता. पण त्या लहान बाळाला दिलेल्या वस्तुमुळे तुम्ही अडचणीत याल याची तुम्हाला कोणतीही माहिती नसते. दरम्यान नाशिकमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. त्या बाळाच्या गळ्यातील नेलकटर काढण्यासाठी पालकांनी मोठी धावपळ केल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

मोहाली टी20 वर पावसाचं सावट?

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून टी20 मालिकेचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मोहालीतल्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया आणि फिंचची ऑस्ट्रेलियन आर्मी वर्ल्ड कपआधीच्या या महत्वाच्या लढतींसाठी सज्ज झाली आहे. पण तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच लढतीत वरुणराजाचं आगमन होण्याचीही शक्यता आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी

मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.ठाकरे सरकारच्या काळात या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते. तर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते.

‘शिवसेना-काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव, पण…’, प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट!

मागच्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य घडल्यामुळे राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे, त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘आम्ही अन्य पक्षासोबत समझोता करत नाही, असा आरोप आमच्यावर होतो, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही आघाडी करतो असा प्रस्ताव पाठवला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही,’ असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक या 5 लोकांच्या खांद्यावर!

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दीडशेहून अधिक वर्षे जुन्या असलेल्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. 2019 पासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने 2000 सालानंतर पक्षाध्यक्षाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक आयोजित करण्याची जबाबदारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची आहे.

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण 5 सदस्यांचे आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि जुने नेते मधुसूदन मिस्त्री याचं नेतृत्व करत आहेत.दुसरे म्हणजे अरविंदर सिंग लवली. 2016 मध्ये काँग्रेसवर नाराज होऊन ते भाजपमध्ये गेले असले तरी वर्षभरानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. CEA चे तिसरे सदस्य 47 वर्षीय जोथिमनी सेन्निमलाई आहेत, ते तामिळनाडूमधील करूरचे लोकसभा खासदार आहेत. आता ते काँग्रेसचे सरचिटणीसही आहेत.चौथे सदस्य कृष्णा बायरे गौडा आहेत, ते कर्नाटकचे तीन वेळा आमदार आणि कुमारस्वामी सरकारमध्ये मंत्री होते. मजबूत पार्श्वभूमी असलेले, कृष्णा कर्नाटकातील एका श्रीमंत शेतकरी कुटुंबातून आले आहेत. ते कृषी तज्ज्ञही आहेत. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे पाचवे सदस्य डॉ. राजेश मिश्रा आहेत. ते उत्तर प्रदेशातील बनारसचे माजी लोकसभा सदस्य आहेत. 72 वर्षीय मिश्रा यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते सक्रिय सदस्य आहेत. आमदार ते खासदार असा प्रवास त्यांनी केला आहे. ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत.

शौचालयातील फरशीवर ठेवलेलं कबड्डीपटूंसाठीचं जेवण; Viral Video मुळे खळबळ

सहारनपूरच्या आंबेडकर स्पोर्ट्स स्टेडियममधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरमध्ये आलेल्या खेळाडूंसाठी तयार केलेलं जेवण स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये ठेवलेलं पाहायला मिळालं. स्पर्धेचं उद्घाटन शुक्रवारी झालं असून, स्टेडियममध्येच खेळाडूंच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.स्विमिंग पुलच्या आवारात जेवण तयार केलं जात असून चेंजिंग रूम आणि टॉयलेटमध्ये राशन ठेवण्यात आलं आहे. जेवण तयार केल्यानंतर ते शौचालयात ठेवण्यात आलं. टॉयलेटच्या फरशीवर भात आणि पुरीचे थर कागदावर पडलेले व्हिडिओमध्ये दिसतात. खेळाडूंना व्यवस्थित चांगलं अन्नही मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

मुसळधार पावसादरम्यान आभाळातून कोसळलं मोठं संकट; 23 जणांनी गमावला जीव

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचंही समोर येत आहे. बिहारमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसासोबतच विजांचा कडकडाटही सातत्याने सुरू आहे. विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिहारमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे.सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बिहारमध्ये सोमवारी वीज पडून तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 8 मुलांसह अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. विज कोसळल्याने अररिया आणि पूर्णियामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुपौलमध्ये तीन, सहरसा, बांका आणि जमुईमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.