महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेवरुन राजकारण भलतंच पेटलं आहे. आता राज ठाकरेंच्या सभा तारखेवरुन राजकारण झालं आहे. राज ठाकरे यांची ठाण्यातील 9 एप्रिलला होणारी सभा आता 12 एप्रिलला होणार असल्याचं समोर आलं आहे. या सभेवरुन आणि ठिकाणावरून वाद निर्माण झाल्यानं आता ही सभा 12 एप्रिलला होणार आहे. ही सभा ठाण्यातील गडकरी रंगायतन समोर होईल. 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे.
राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेच्या ठिकाणावरुन वाद निर्माण झाला होता. आधी या सभेसाठी 9 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली होती. यासाठी ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील मूस रोड येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी मनसेच्या नेत्यांनी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी मनसेला दुसरा उपाय म्हणून बंदिस्त सभागृह किंवा खुले मैदान या ठिकाणी सभा घेण्याची सूचना दिली.
त्यानंतर पोलिसांनी विनंती केल्यानं तारीख बदलली असल्याचं स्पष्टीकरण मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे. गेल्या वेळी गडकरी रंगायतनजवळ राज ठाकरेंची सभा झाली होती. यावेळची सभा त्यालाच लागून असलेल्या तलावपाळी या ठिकाणी होण्यासाठीचा प्रस्ताव मनसेनं पोलिसांना दिला होता. पण ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.