गुजरात टायटन्सची टीम पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. या टीमनं आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. 8 पैकी 7 सामने जिंकत हार्दिक पांड्या कॅप्टन असलेली गुजरातची टीम सध्या टॉपवर आहे. ही स्पर्धा सुरू होण्याच्यापूर्वी गुजरातच्या यशाचा विश्वास खूप कमी क्रिकेट तज्ज्ञांना होता. पण, त्यांनी सर्वांचा अंदाज चुकवत स्पर्धेच्या सुरूवातीपासून पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
गुजरातच्या विजयात त्यांच्या बॉलर्सचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी पहिल्या 6 ओव्हर्सच्या ‘पॉवर प्ले’ मध्ये आत्तापर्यंत 19 विकेट्स घेतल्यात. हे या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या 10 टीममधील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबाद झालेल्या मॅचमध्येही त्यांनी 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन मोठी खेळी करू शकला नाही. तो 8 बॉलमध्ये 5 रन काढून मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर आऊट झाला. तर राहुल त्रिपाठीलाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शमीनंच त्याला 16 रनवर आऊट केलं.
गुजरातच्या बॉलर्सनी 8 पैकी 4 मॅचमध्ये पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेटस घेतल्या आहेत. त्यांनी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध सर्वोत्तम कामगिरी करत ‘पॉवर प्ले’ मध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय केकेआर, राजस्थान आणि दिल्ली विरूद्ध प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. पंजाब आणि सीएसके विरूद्ध गुजरातला 2-2 विकेट्स मिळाल्या. तर हैदराबाद विरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये गुजरातला एकही विकेट मिळाली नव्हती. गुजरातला तो सामना गमवावा लागला. त्यांचा या स्पर्धेतील तो एकमेव पराभव आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय. त्यानं 8 मॅचमध्ये सर्वात जास्त 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.53 आहे. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सनं मिळवलेल्या यशाचा शमीच शिल्पकार आहे.