शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. 40 आमदार आणि 12 खासदार आपल्यासोबत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. आता मंत्रालयातून सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे निकाली काढलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्ष असा उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळेशिवसेना कुणाची? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून राखीव आहे. मात्र, शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे, तर भाजपकडून सुद्धा खरे शिवसैनिक हे आपल्यासोबत आहे, असं म्हणत आहे. आता मंत्रालयातून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा शिवसेना असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय कार्यक्रमात शिंदेंचा शिवसेना पक्ष असा उल्लेख आहे. मुख्यमंत्री सचिवालय अर्थात जनसंपर्क कक्षातून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन असलेले वेळापत्रक प्रसिद्ध केले जात असते. या वेळापत्रकामध्ये ‘दुपारी 2 वाजता :- शिवसेना पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती, स्थळ :- कावसानकर स्टेडियम ता. पैठण, औरंगाबाद’ असा उल्लेख केला आहे.पैठणमध्ये शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे हजर राहणार आहे. पण, संदीपान भुमरे यांचा हा कार्यक्रम शिवसेना पक्षाचा कार्यक्रम असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.