अनेक खासगी रुग्णालयांमधून लाखो रुपयांच्या बिलांची आकारणी करुन रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सुरुच आहेत. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये अपोलो रुग्णालयाने उपचारासाठी दाखल झालेला रुग्णाचा मृतदेह देण्यासाठी आडकाठी केल्याचा आरोप होत आहे. 11 लाख 50 हजार रुपयांचे बिल भरल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जाईल, अशी मुजोरी रुग्णालय प्रशासनाने केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. कोपरखैरणे गावातील पाटील कुटुंबाला हा वाईट अनुभव आला आहे.
या प्रकरणी शिवसेना खासदार राजन विचारे आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवराम पाटील यांनी शनिवारी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेतली. लेखी तक्रार करून रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोपरखैरणे गावातील रहिवासी नाना नकुल पाटील (वय 38) यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात मंगळवार 11 मे रोजी सायंकाळी 4.58 वाजता दाखल केले होते. रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना कोव्हिड तपासणीसाठी पाठवले. कोव्हिडचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.
वैद्यकीय तपासणीत नाना पाटील यांच्या पॅनक्रियाजमध्ये दुखापत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना 75 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. तिसऱ्या दिवशी पुन्हा 3 लाख 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. मृत व्यक्तीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी त्यावेळी पैशाची जमवाजमव करत कसेबसे एक लाख रुपये भरले.
मंगळवार 18 मे रोजी नाना पाटील यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित करुन तब्बल 11 लाख 49 हजार 877 रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. जोपर्यंत साडे अकरा लाख रुपयांची रक्कम भरली जात नाही तोपर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नव्हता, असे कोपरखैरणे गावचे माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.
संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच मृतदेह 18 मे रोजी रात्री 11 वाजता ताब्यात देण्यात आला. दर दिवशी दोन लाख रुपये अशी कोणती महागडी ट्रीटमेंट होती, असा रुग्णांच्या नातेवाईकांनी सवाल केला आहे. कोरोनाच्या महामारीत नाना पाटील यांचे साडे अकरा लाख रुपयांचे बिल गावातील 11 जणांनी पैसे जमा करुन भरल्याचेही पाटील यांनी सांगितले. अवास्तव आकारण्यात आलेल्या बिलापोटी रुग्णांच्या नातेवाईकांची लूट थांबवून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.