आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना असू शकते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (ICMR) प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रचे (RMRC) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी बोरकाकोटी यांनी ही माहिती दिली.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना विषाणूच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही प्रकारात संसर्ग झाल्याचे आढळले. मे महिन्यात, आरएमआरसीच्या प्रयोगशाळेतील रूग्णात दुहेरी संसर्ग आढळला. डॉ. बोरकाकोटी म्हणाले की, ब्रिटन, ब्राझील आणि पोर्तुगाल येथे दुहेरी संसर्गाची काही प्रकरणे नोंदली गेली होती, परंतु भारतात यापूर्वी अशी घटना घडलेली नाही.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर, त्या महिलेला आणि तिच्या पतीला कोरोनाव्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाल्याचे आढळले. हे जोडपे डॉक्टर आहे आणि कोविड केअर सेंटरमध्ये आपली सेवा बजावत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले, ‘आम्ही पुन्हा या जोडप्याचे नमुने गोळा केले आणि परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात महिला डॉक्टरमध्ये दुहेरी संसर्गाची पुष्टी झाली.’ त्यांनी सांगितले की महिला डॉक्टरला घसा खवखवणे, शरीरावर वेदना आणि झोपेची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.