अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवार ऋजुता लटके यांच्यानंतर नोटा ला १२ हजारांहून अधिक मतदारांनी पसंती दिली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये देशात लातूर ग्रामीणचा ‘नोटा’चा विक्रम मानला जातो. त्यापाठोपाठ राज्यात अंधेरीमधील मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विजयी उमेदवार लटके यांना ६६,५३० मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर नोटाला १२,८०६ मतदारांनी पसंती दिली. नोटाचा पर्याय स्वीकारावा म्हणून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता.
राज्यात लातूर ग्रामीण मतदारसंघात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २७,५०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला होता. देशात विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक नोटाला मते लातूर ग्रामीणमध्ये मिळाली होती. या मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख विजयी झाले व त्यांना १ लाख ३५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर नोटाला मतदारांनी पसंती दिली होती. शिवसेनेच्या सचिन देशशमुख यांना १३,५२४ मते मिळाली होती. ‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉन्स’ (एडीआर) या संस्थेने नोटाला देशभर मिळालेल्या मतांच्या आधारे केलेल्या अहवालात, २०१३ मध्ये नोटाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आल्यापासून विविध लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये २ कोटी ६० लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यापैकी ६६ लाख मतदारांनी विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ५१,६६० नोटाला मतदारांनी पसंती बिहारमधील गोपाळगंज मतदारसंघात दिली होती.