भुसावळ खाद्य भ्रमंती : 8 भुसावळमधले ब्राह्मण संघाचे मंगल कार्यालय तसे बरेच जुने बहुदा 1932 च्या आसपास स्थापना झालेल, ( अशी माहीती आहे ) पण त्याच संपुर्ण नांव कधीही कोणीही उच्चारत नसत..लग्न कुठे आहे अस विचारल तर ” ब्राह्मण संघात ” ..गांव लहान तसा हा समाजही लहान .स्वत:च कुटुंब सांभाळुन टुकिने संसार करणारा..बँकेत, रेल्वेत व इतर प्रशासकिय सेवेत, ब्राह्मण समाजाची मंडळी रुळलेली.पण समाजातल्या सर्व जाती जमातींशी मिळुनमिसळुन असणारी.. टिपीकल ब्राह्मणी पध्दतीचे जेवण ..गोडं वरण , भात त्यावर साजुक तुप , पातळ भाजी व डाव्या बाजुला ( का उजव्या ? ) लिंबाच गोड लोणचं..पण ह्या सर्वांवर गावाची छाप असायचीच , तो म्हणजे नावाला का होईना तिखटपणा..आमच्या मित्रमंडळींमध्ये पाटील, झोपे , बेंडाळे, फालक , अग्रवाल, शेख,यांच्या सोबत भट, पाठक, जोशी , कुलकर्णी असा भरगच्च गोतावळा .. या मित्रांच्या नातेवाईकांची, त्यांच्या घरातली लग्न हि ह्या ब्राह्मण संघात व्हायची. तेव्हा आमचा ब्राह्मण संघातला मुक्काम हा ठरलेला..बहुतेक वेळी आम्ही मुलीकडुनच असायचो.. व-हाड हे बाहेरगावांवरुन यायचं. आणि जर का हे व-हाड मोठ्या शहरांमधले असेल तर त्या मंडळींचा तोरा काय असायचा महाराज..आमच गांव तस लहान , त्यामुळे गावाचा उध्दार नाही पण तुलना नक्की व्हायची. कार्यालय मात्र स्वयंपुर्ण होते, व-हाडी मंडळींची रात्रीची सोय , (म्हणजे जेवणा, झोपण्याची म्हणतोय मी) हि अगदी चोख असायची. सकाळी जिथे लग्न लागणार त्याच हाँलमध्ये झोपण्याची व्यवस्था केली जायची , त्यासाठी लागणा-या गाद्या, जाजम, बिछायती, तक्के ह्या कार्यालयाच्या आँफिसमधुन घेतल्या जायच्या. यात बरीच रात्र व्हायची मग ब-याच उशिरा आमची हि पु.लं.च्या भाषेतली समस्त ” नारायण ” गँग , उद्याच्या तयारीच्या विचारात कुठेतरी अंगाच मुटकुळ करुन झोपी जायची..सकाळी व-हाडी मंडळी त्यांचे समस्त कार्यक्रम आटोपुन, झकपक तयारी करुन खाली उतरायचे..दोनमजली छोटेसे टुमदार कार्यालय,( आता बरच वाढवलय ) त्याच्या मधल्या चौकात नाश्ता, चहा दुपारच्या जेवणाती तयारी सुरु असायची..पाहुण्यांना प्रथम नाश्ता दिला जायचा.. भरपुर दाणे ,कढिपत्ता,कांदा घातलेले चविष्ठ पोहे किंवा मुगाची दाळ किंवा हरब-याची दाळ , कांदा , मेथ्या घातलेला उपमा वर कोथींबिर भुरकवुन व जोडीला गरमागरम चहा .. चवीला कितीही चांगला असला तरी, व-हाडीमंडळीतील काही ठराविक नग हे तेल न घातलेल्या बिजागि-यांसारखे कुरकुरत असायचे ” नाश्ता बराय पण तिखटाच प्रमाण जरा..you know.. अस चाल्लेल असायचं.. आमच्या मित्रांपैकी काही नग कानाशी कुजबुजायचे..” ह्यायले जरा आमच्या ,भर उन्हायाच्या पंगतीत नेल पाह्यजे , आपली वांग्याची भाजी खाल्ली म्हंजे , समजीन तिखट काय असते ते….नव-या मुलीचा भाऊ (जो आमचा मित्र ) , तो डोळे वटारुन सांगायचा ..थोडं हळु ! लग्नाचा मुहूर्त सकाळी लवकरचा ..10.30 ते 11.00 च्या दरम्यानचा , जवळच्याच मंदिरात नवरोबा मिरवुन आणायचा, माफक नाचण किंवा नसायच देखील, त्यामुळे मुहूर्ताची वेळ हि चुकायची नाही. मंगलाष्टकांचा जोर असायचा,अनेक होतकरु आपआपले घसा खरडवुन घ्यायचे . नंतर पंगतींना सुरुवात व्हायची , सगळ कस अगदी वेळेत 11.30 किंवा 12.00 पर्यंत पहिली पंगत बसायची देखील. पंगतीसाठी लांबचलांब अश्या सतरंज्यांच्या पट्टया टाकल्या जायच्या व मंडळी त्यावर पाठीला पाठ लावुन बसायची. स्टिलचे ताट , त्यात मेन्युप्रमाणे दोन चार वाट्या व पाण्यासाठी ग्लास. ताटाच्या डाव्या बाजुला मीठ, लोणचं ( कैरीच व लिंबाच गोड लोणचं ) काकडीची दाण्याच कूट घातलेली कोशींबिर,टोमँटोची कोशींबीर , चटणी पापड इ. मग उजव्या बाजुला, एका वाटीत आंबटचुक्याची दाणे घातलेली भाजी ( ती मात्र वांग्याच्या भाजीप्रमाणे हिट ),एका वाटीत उसळ , बटाट्याची सुकी भाजी, पोळी त्यावर लाडु, खडे मसाले घालुन केलेला जरासा हिरवा रंग असलेला मसाले भात व ताटाच्या मध्यभागी भात त्यावर गोडं किंवा आंबटगोड वरण त्यावर साजुक तूप घातलेल व याच्या जोडीला या कार्यालयाचा फेमस मठ्ठा , आलं, मिरची,कोथींबिर याची जोड दिलेला हा मठ्ठा ह्या सर्व पंचपक्वांनावर कडी करुन जायचा. अस्सल भुसावळकर तो वाटीत न घेता पेल्यात घ्यायचे. मग सुरु व्हायचे श्लोक..यजमानांकडील एखादे काका,मामा यात अग्रेसर असायचे..वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे..सहज हवन होते नाम घ्या फुकाचे असे चार दोन श्लोक खणखणीत आवाजात ठणकावले जायचे.. समोर अस ताट असतांना मंडळी संताच्या संयमाने महत्प्रयासाने त्याला साथ द्यायची किंवा तो लवकर थांबावा अशी मनातल्या मनात प्रार्थना करायची..यथासावकाश ते काका , मामा थांबायचे व हात जोडुन सांगायचे, मंडळी आता करा सुरुवात कि मग दणक्यात की पंगत सुरू व्हायची..वाढायला आपली ठरलेली ” नारायण गँग”..मंडळीचे जिलबीचे , लाडवांचे आग्रह सुरू व्हायचे…लग्न जरी वेळेत लावायची घाई झाली तरी पंगती ह्या तब्येतीत सावकाश व्हायच्या..यजमानांकडची माणस पंगतीत वाढत, “स्वस्थ होऊ द्या मंडळी” वगैरे हाळी देत चालायचे..आटोपशीर व वेळेवर लागणारी लग्न व रुचकर जेवण अशी ह्या ब्राह्मण संघाची ओळख होती, अजुनही असेलच याची खात्री आहे.
©सारंग जाधव