जळगाव जिल्ह्यात नियमावलीची अंमलबजावणी करावी : मंत्री गुलाबराव पाटील

कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी राज्य शासनाने पारित केलेल्या नियमावलीची जळगाव जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी. रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. रेमडेसिविरचा साठा पुरेसा ठेवावा. रुगणालयांमध्ये पुरेशे व्हेंटिलेटर रहातील याचे नियोजन करावे. अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घेताना विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

यावेळी कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याबरोबरच रुग्णांना रुग्णालयांची बील देणे आवश्यक असून चोपडा येथे तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी केली. तर कंटेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांचे सहकार्य महत्वाचे आहे. याकरीता नागरीकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे आमदार शिरीष चौधरी म्हणाले तर संजय सावकारे यांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेण्याची सूचना केली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी रात्रीच्यावेळी सुरु रहावी याकरीता महानगरपालिकेने आवश्यक ते नियेाजन करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केली तर जिल्ह्यात शासनाच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास लॉकडाऊन करावा तसेच कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेत भितीचे वातावरण आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील दोन/ तीन दिवस रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता मुलबक साठा असून अजून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचे आवश्यक ते सहकार्य मिळत असून जिल्हावासियांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केले. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस प्रभारींना दिल्या असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.