नागपुरात दसऱ्याच्या दिवशी दोन मोठे आणि महत्त्वाचे सोहळे आोयजित केले जातात. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसाठी दीक्षाभूमी सोहळा महत्त्वाचा असतो. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या दिवशीच शस्त्रपूजन केले जाते. मात्र हे दोन्ही कार्यक्रम यावर्षी कोरोना संसर्गामुळे मार्यादित स्वरुपात साजरे केले जाणार आहेत. संघाच्या शस्त्रपूजनाला कोणताही प्रमुख पाहुणा नसेल तर दीक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. यात लोकाग्रहास्तव दीक्षाभूमी स्तुपात दर्शन घेता येणार आहे. या दर्शनासाठी 18 वर्षाखालील आणि 65 वर्षवरील लोकांना प्रवेश नसणार आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर प्रवेश दिला जाईल.
एकच रांग असल्याने दर्शनासाठी भाविकांना थोडा विलंब होणार आहे. अन्नदानाला दीक्षाभूमी परिसरात बंदी असणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मोजक्याच लोकांच्या उपास्थितीत ध्वजारोहण होईल. 15 ऑक्टोबरला 9 वाजता पूज्य भन्ते नागार्जुन सुरइ ससाइ यांच्या उपस्थितीत स्मारक समितीच्या लोकांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना होईल.
दीक्षाभूमी स्मारक समिती सचिव डॉ. सुधीर फुलझले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तर दीक्षाभूमी विकासासाठी बाकी असलेली राशी सरकारने अजूनपर्यंत दिली नसल्याचं सांगत त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली.
तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसऱ्याच्या दिवशी होणारा शस्त्रपूजन सोहळा मर्यादित स्वरूपात आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला मर्यादित लोकांची उपस्थिती राहील. तसेच कार्यक्रमासाठी या वर्षी कुठल्याही मुख्य अतिथीला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. दरवर्षी देशातील महत्त्वाचा व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित असतो. मात्र कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.