रजनीकांतची मुलगी, अभिनेता धनुष यांचा घटस्फोट

सामंथा प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका पॉवर फूल्ल कपल्सने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अभिनेता धनुष याने सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षानंतर हे दोघेही वेगळे होत आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 18 वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.

ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा 2004मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. मध्यंतरीही हे दोघे विभक्त होण्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या दोघांनीही मीडियाशी कधीच संवाद साधून या बातम्यांचं खंडन केलं नव्हतं.

धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष मल्टिटॅलेंटेड आहे. धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.

Kadhal Kondaen या सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वर्याची धनुष सोबत ओळख करून दिली. ऐश्वर्याने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं होतं. ऐश्वर्याने कामाचं कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वर्याला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वर्याला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघं चांगले मित्रं बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते. मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असंच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.