राज कुंद्राला १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे.
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांवर
पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अतिवृष्टीतील बळींची संख्या
आता २०० वर पोहोचली
राज्यात २२ ते २४ जुलैदरम्यान कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या आता २०० वर पोहोचली असून अजूनही २५ लोकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त के ली जात आहे. राज्यात ४८ जण जखमी आहेत. दरड कोसळल्याने तसेच पुरामुळे गेल्या २४ तासांत रायगडमध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला असून साताऱ्यात ४ तर वर्धा आणि अकोला जिल्ह्यात प्रत्यकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग
चार दिवसानंतर झाला खुला
अतिवृष्टीमुळे रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सोमवारी खुला झाला. मार्ग सुरू असला तरी पहिल्यांदा अत्यावश्यक वाहनांना सोडले जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नेत्यांनी पूरग्रस्त भागातील
दौरे टाळावेत : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं.
धुळे जिल्ह्य़ात पावसाने पाठ
फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट
राज्यातील बहुतेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असताना धुळे जिल्ह्य़ात मात्र त्याने पाठ फिरवली आहे. यामुळे प्रारंभी शेतकऱ्यांचे पीकपेऱ्याचे नियोजन काहीसे बिघडले, पण ज्यांनी खरिपाची पेरणी केली, त्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आठ दिवसांत अपेक्षित पाऊस न झाल्यास दुबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नसल्याने टंचाईचे संकटही गडद होत आहे.
अभिनेता कमाल आर खानवर
बलात्कार करण्याचा आरोप
बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर त्याचे मत मांडताना दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली. मात्र, आता त्याच्यावर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
विजय मल्ल्याला ब्रिटनमधील
न्यायालयाने केले दिवाळखोर घोषित
ब्रिटनमधील न्यायालयाने भारतातून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना दिवाळखोर जाहीर केले आहे. त्यामुळे मल्ल्या यांच्या जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचा भारतीय स्टेट बँकेसह भारतातील अन्य बँकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या बँकांनी मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाईन्सला कोटय़वधींचे कर्ज दिले आहे. ही हवाई वाहतूक कंपनी बंद पडली असून तिला दिलेले हे कर्ज थकित आहे. येथील उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागातील दिवाळखोरी आणि कंपनीविषयक मुख्य न्यायालयाचे न्यायाधीश मायकेल ब्रिग्ज यांनी मल्ल्या यांना दिवाळखोर जाहीर करण्याचा निर्णय सुनावला.
लिबियाच्या समुद्रात बोट बुडाली
५७ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
आफ्रिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट काल लिबियाच्या समुद्रात बुडाली. या दुर्घटनेमध्ये किमान ५७ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युरोपात चांगल्या जीवनशैलीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांसोबतची ही नवी दुर्घटना समोर आली आहे.
करोना विषाणूचे मूळ
शोधण्यासाठी अमेरिकेत जा
जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट करत ही मागणी फेटाळून लावली होती. चीनमधील करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या दुसऱ्या फेरीच्या तपासणीची मागणी जसजशी तीव्र होत असतानाच, तशीच बीजिंगने अमेरिकेवर हल्ला चढवला आहे. चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आवाहन केले आहे.
क्रिकेटपटू कृणाल पंड्याला
करोनाची लागण
श्रीलंका दौर्यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी होती. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार होता, पण टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला करोनाची लागण झाली आहे.
SD social media
9850 60 3590