टोकियो ऑलंपिक मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डगमगलेल्या टीम इंडियानं स्पेनला मात्र धूळ चारली. भारतानं स्पेनचा 3-0 असा पराभव केला. या विजयामुळे ग्रुप ए मध्ये (Group A) भारताचं स्थान काहीसं मजबूत झालंय. ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष स्पेनविरोधात भारताचा खेळ पूर्णपणे बदलेला दिसला. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डिफेन्स आणि फॉरवर्ड दोन्ही गायब होते, स्पेनविरोधात मात्र त्यांनीच कमाल केली. पेनल्टी स्ट्रोक, पेनल्टी कॉर्नरचा उत्तम वापर करत टीमनं गोलही केले.
भारत आणि स्पेनमधल्या विजेत्याचा निकाल चौथ्या क्वार्टरनंतर लागला. तसं तर पहिल्याच क्वार्टरमध्ये विजयी कोण होणार हे निश्चित झालं होतं. कारण भारतानं ह्या सामन्यात वेगवान हॉकीचं प्रदर्शन केलं. त्याचाच फायदा भारताला शेवटपर्यंत झाला.
भारताकडून पहिला गोल हा सिमरनजितसिंहनं 14 व्या मिनिटाला केला. विशेष म्हणजे ह्या ऑलंपिकमध्ये सिमरनजितसिंहचा हा पहिलाच गोल आहे. त्यानंतर पुढच्या मिनिटाभरात भारताला एक पेनल्ट्री स्ट्रोक मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा उचलत रुपिंदरपाल सिंहनं गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ज्यावेळेस पहिल्या क्वार्टरची शिटी वाजली त्यावेळेस भारत मजबूत स्थितीत आला.
दुसऱ्या, तिसऱ्या क्वार्टरमध्ये वेगवान हॉकी
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन गोल झाले. दुसऱ्या क्वार्टरमध्येही असच काहीसं पहायला मिळेल असं वाटत असतानाच, एकही गोल झाला नाही. फक्त वेगवान हॉकीचं प्रदर्शन तेवढं पहायला मिळालं. जी स्थिती दुसऱ्या क्वार्टरची झाली तशीच तिसऱ्या
क्वार्टरमध्येही घडलं. फक्त वेगवान हॉकी पहायला मिळाली. याच दरम्यान स्पेनचा कप्तान मिग्युएल डेलासला यलो कार्ड दाखवलं गेलं आणि त्याला 5 मिनिटं सामन्याबाहेर बसावं लागलं. पण तरीही स्पेनचं आक्रमण सुरुच राहीलं. तिसरा क्वार्टरच्या
शेवटच्या सेकंडमध्ये स्पेननं गोलही केला पण तोपर्यंत शिटी वाजली होती. स्पेननं यावर पेनल्टी कॉर्नरची मागणी करत
रिव्यू घेतला. तो त्यांच्या फेवरमध्ये गेला पण त्यावर ते गोल नाही करु शकले.