राजस्थान सरकारने सोमवारी 26 आयएएस आणि 16 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. या माध्यमातून सरकारने राज्याच्या पोलीस आणि प्रशासकीय रचनेत मोठे फेरबदल केले. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्याच्या सून आयएएस अधिकारी टीना डाबी यांचाही समावेश आहे.
टीना डाबी या जैसलमेरच्या 65व्या जिल्हाधिकारी-
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जयपूर, धौलपुर, बूंदी, अलवर, डूंगरपुर आणि जैसलमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. जैसलमेरच्या तिसऱ्या महिला जिल्हाधिकारी डॉ. प्रतिभा सिंह यांच्या जागी आयएएस अधिकारी टीना डाबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या याआधी संयुक्त शासन सचिव, वित्त (कर) या पदावर कार्यरत होत्या. 2015च्या बॅचच्या टीना डाबी यांनी पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या टीना डाबी या जैसलमेरच्या 65व्या जिल्हाधिकारी होतील.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन पोलीस महानिरीक्षक, सहा जिल्हाधिकारी आणि तीन पोलीस अधीक्षक यांची बदली करण्यात आली आहे. तर चार आयएएस अधिकाऱ्यांना अन्य पदांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
टीना डाबी यांचे महाराष्ट्राशी नाते –
टीना डाबी यांचं पहिलं लग्न त्यांचेच बॅचमेट आणि आयएएस अधिकारी असलेल्या अतहर खान यांच्यासोबत झालं होतं. परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आता टीना डाबी यांनी मराठमोळे अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याच्या सून झाल्या.प्रदीप गावंडे यांनीच पुढाकार घेऊन प्रपोज केल्याचं टीना यांनी एका मुलाखतीत सांगितलं. टीना प्रदीप यांना डॉक्टर साहब म्हणून हाक मारतात. टीना आणि अतहर खान यांचा घटस्फोट होण्याआधीच प्रदीप गावंडे आणि टीना यांच्यात जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं. टीना आणि अतहर यांचा ऑगस्ट 2021मध्ये घटस्फोट झाला तर, टीना आणि प्रदीप यांच्यात मे 2021 मध्ये जवळीक वाढली.